हिमाचल प्रदेशवर ८३ धावांनी मात; ऋतुराजचे धडाकेबाज शतक

युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने झळकावलेले धडाकेबाज शतक व त्याला गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीची लाभलेली सुरेख साथ यामुळे महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटात हिमाचल प्रदेशवर ८३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह महाराष्ट्राने पाच सामन्यांतून पाच विजयांसह गुणतालिकेत सध्या प्रथम स्थान मिळवले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने जय पांडेला (६) लवकर गमावले. मात्र त्यानंतर रोहित मोटवानीसह ऋतुराजने हिमाचलच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी ११३ धावांची भागीदारी रचली. रोहित ५३ धावांवर बाद झाल्यावरही ऋतुराजने त्याचा धडाका कायम राखत शतकाला गवसणी घातली. ११५ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह त्याने ११४ धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यावर महाराष्ट्राचा डाव घसरला. ४९.५ षटकांत त्यांनी २७८ धावांपर्यंत मजल मारली. हिमाचलच्या प्रशांत चोप्राने एकाच षटकात तीन बळी मिळवत महाराष्ट्राचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने ऋतुराजसह कर्णधार राहुल त्रिपाठी (१०), अथर्व काळे (१४) यांचे बळी मिळवले.

प्रत्युत्तरात हिमाचलचा डाव ४४.२ षटकांत १९५ धावांवर आटोपला. त्यांच्यातर्फे निखिल गांगटा ७६ आणि अंकुश बैन्स ६२ यांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने हिमाचलला पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्रासाठी समद फल्लाहने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ४९.५ षटकांत सर्व बाद २७८ (ऋतुराज गायकवाड ११४, रोहित मोटवानी ५३; प्रशांत चोप्रा ४/२०) विजयी वि. हिमाचल प्रदेश : ४४.२ षटकांत सर्व बाद १९५ (निखिल गांगटा ७६, अंकुश बैन्स ६२; समद फल्लाह ३/१८).