विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्नाटकच्या संघाने तामिळनाडूचा ६० धावांनी पराभव केला. कर्नाटकने प्रथम गोलंदाजी करत तामिळनाडूला २५२ धावांत रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना पावसाच्या वत्ययामुळे कर्नाटकला १४६ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. हे आव्हान त्यांनी २३ षटकांत पूर्ण केले आणि कर्नाटकला विजय हजारे करंडक स्पर्धेचा ‘विजयी चौकार’ लगावला. आपल्या ३० व्या वाढदिवशी हॅटट्रिकची किमया साधणाऱ्या अभिमन्यू मिथून याला सामनावीर घोषित करण्यात आले.

‘बर्थ-डे बॉय’ अभिमन्यू मिथूनची हॅटट्रिक; केला विक्रमांचा ‘डबल धमाका’

नाणेफेक जिंकून कर्नाटकाने प्रथम तामिळनाडूला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुरली विजय (०) आणि रविचंद्रन अश्विन (८) हे दोघे स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर अभिनव मुकुंद (८५) आणि बाबा अपराजित (६६) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यांनी शतकी भागीदारी केली. पण त्यानंतर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कर्नाटकच्या अभिमन्यू मिथून याने हॅटट्रिक घेतली. तामिळनाडूच्या संघाचे शेवटचे तीन गडी बाद करत त्याने आपल्या विजय हजारे स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली. त्याने ९.५ षटकांत ३४ धावा देऊन ५ गडी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या वाढदिवशी त्याने ही किमया साधली.

अभिमन्यू मिथून

२५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर देवदत्त पडीक्कल ११ धावांवर स्वस्तात बाद झाला. मधल्या काळात पावसाच्या वत्ययामुळे कर्नाटकला सुधारित लक्ष्य देण्यात आले. हे लक्ष्य दुसऱ्या जोडीनेच पूर्ण केले. मयांक अग्रवालने नाबाद ६९ धावा तर लोकेश राहुलने नाबाद ५२ धावा केल्या आणि विजेतेपद जिंकले.