विजय हजारे चषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईने मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ९ गडी राखत सामना जिंकला. या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉ चं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. मुंबईला विजयासाठी बडोद्याने २३९ धावांचं आव्हान दिलं होतं.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बडोद्याची फलंदाजी मुंबईच्या माऱ्यासमोर फारशी तग धरु शकली नाही. सलामीवीर आदित्य वाघमोडे माघारी परतल्यानंतर कृणाल पांड्याने केदार देवधरसोबत भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. मात्र केदार देवधर माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने बडोद्याचे फलंदाज माघारी परतत राहिले. मधल्या फळीत युसूफ पठाण आणि पिनल शहाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची डाळ शिजू शकली नाही. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ४ तर विजय गोहीलने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या मुंबईने आक्रमक सुरुवात केली. इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉने आक्रमक फटकेबाजी करत डावाला सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. पृथ्वी शॉ आपलं शतक झळकावणार असं वाटत असताना पांड्याने त्याला माघारी धाडलं. यानंतर श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे जोडीने फारशी पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाला विजय मिळवून दिला. अजिंक्यने नाबाद ७९ तर श्रेयस अय्यरने नाबाद ५६ धावांची खेळी केली.