अक्षय कर्णेवार आणि उमेश यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे आंध्र प्रदेशचा डाव फक्त ८७ धावांवर गडगडला. त्यामुळे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेच्या ‘क’ विदर्भाने आंध्र प्रदेशवर दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
पालम येथील मॉडेल क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी आंध्र प्रदेशचा डाव फक्त २५.३ षटकांत गुंडाळला. उमेशसोबत नवा चेंडू हाताळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघने आंध्रचा सलामीवीर कोरिपल्ली श्रीकांतला भोपळा फोडण्याआधीच तंबूची वाट दाखवली. उमेशने तीन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षय कर्णेवारने चार बळी घेत आंध्रला हादरे दिले. कर्णधार प्रशांत कुमारने सर्वाधिक ३८ धावा केल्या.
त्यानंतर सलामीवीर जितेश शर्मा (नाबाद ४७) आणि फैझ फैझल (नाबाद ४४) यांनी फक्त १९.२ षटकांत हे लक्ष्य पार केले.विदर्भाने या सामन्यातून चार गुण वसूल केले असून पाच सामन्यांपैकी चार विजय मिळवत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान बळकट केले आहे. आंध्रने पाच सामन्यांपैकी दोन विजय मिळवले आहेत.

संक्षिप्त धावफलक
आंध्र प्रदेश : २५.३ षटकांत सर्व बाद ८७ (प्रशांत कुमार ३८, कुप्पू गणेश कुमार १७; अक्षय कर्णेवार ४/१३, उमेश यादव ३/१६) पराभूत वि. विदर्भ : १९.२ षटकांत बिनबाद ९१ (जितेश शर्मा नाबाद ४७, फैझ फझल नाबाद ४४; शिवा कुमार ०/१३).