अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी जाळ्यात अडकलेला भारताचा अव्वल बॉक्सिंगपटू विजेंदर सिंग हा दोन दिवस रंगलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी न झाल्यामुळे आगामी दोन स्पर्धासाठी त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.
हेरॉईन सेवन केल्याच्या आरोपांमुळे पंजाब पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला विजेंदर पतियाळामध्ये झालेल्या दोनदिवसीय बॉक्सिंग शिबिरात हजर झाला नाही. त्यामुळे सायप्रस आणि क्युबा येथे होणाऱ्या दोन स्पर्धासाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. ऑक्टोबरमध्ये कझाकस्तान येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने या दोन्ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. ‘‘विजेंदरने स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करणे गरजेचे होते. शिबिरात सहभागी न होताच भारतीय संघात त्याला स्थान दिले जाणार नाही,’’ असे भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाकडून सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय महासंघावर बंदी आणल्यामुळे भारतीय बॉक्सर्स या स्पर्धेत एआयबीएच्या ध्वजाखाली उतरणार आहेत. हेरॉईन प्रकरणातून विजेंदरची सहीसलामत सुटका होईल, अशी आशा भारतीय बॉक्सिंग महासंघाला वाटत आहे. ‘‘हेरॉईन प्रकरणामुळेच विजेंदर शिबिराला उपस्थित राहू शकला नाही. विजेंदर हा ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू आहे. त्यामुळे त्याने कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हावे, हे त्यानेच ठरवावे. मी विजेंदरच्या संपर्कात असून हेरॉईन प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचे त्याने ठामपणे सांगितले आहे. सध्या विजेंदरवर प्रचंड दडपण असून येत्या काही दिवसांत तो निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, अशी आशा आहे,’’ असे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अभिषेक मटोरिया यांनी सांगितले.