पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा काल (शुक्रवार) निर्णय घेतला. या निर्णयाचे काही जणांनी स्वागत केले तर काहीनीं भाजपा सरकारला टोला लगावला आहे. काँग्रेसने देखील मोदीसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या वादात ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने उडी घेतली आहे. विजेंदर सिंगने नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला.

“भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विट करत लगावला आहे. विजेंदर सिंग याचे ट्विट खूप चर्चेत असतात. यापूर्वी देखील त्याने ऑलिम्पिक कव्हर करण्याबाबत भारतीय प्रसारमाध्यमांवर जोरदार निशाणा साधला होता.


बॉक्सर विजेंदर सिंगने २००४ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला. त्यावेळी हरियाणामध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि विजेंदरला मोठ्या पदावर नोकरीसह मोठा रोख रकमेसह पुरस्कार मिळाला. दिल्लीच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत विजेंदर सिंह यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला.

…म्हणून बदललं खेलरत्न पुरस्काराचं नाव

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती काल दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले असून हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासा त्यांनी केला.

खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं मोदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुर्सकारांचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

खेलरत्न पुरस्कार काय आहे?

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येतं.