भारताचा मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने शनिवारी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या केरी होपवर मात केली. विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंग खेळायला सुरूवात केल्यापासून सर्व सहा सामने जिंकले होते. त्यामुळे तो आज केरी होपविरुद्धच्या सामन्यात सातत्य राखत विजय मिळवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर केरी होप हा नावाजलेला आणि अनुभवी मुष्टियोद्धा म्हणून ओळखला जातो. होप हा माजी डब्ल्यूबीओ युरोपीय चॅम्पियन राहिला असून त्याचा जिंकण्याचे आणि हारण्याचे प्रमाण २३:७ असे होते. त्यामुळे विजेंदर सिंगपुढे मोठे आव्हान होते. मात्र, विजेंदरने हे आव्हान लीलया परतावून लावले. विजेंदरने केरीवर ९८-९२, ९८-९२ आणि १००-९० अशी मात केली. या विजयानंतर विजेंदरने भारतवासियांचे आभार मानले आहेत. ही लढत दहाव्या फेरीपर्यंत जाईल असे मला वाटले नव्हते. हे माझे एकट्याचे यश नसून माझ्या संपूर्ण देशाचे यश आहे. मी बराच काळापासून या विजयासाठी मेहनत घेत होतो. अखेर मी ते साध्य केले आणि भविष्यात मी माझे रँकिंग सुधारण्यासाठी प्रयत्न करेल,अशी प्रतिक्रिया यावेळी विजेंदरने व्यक्त केली.