पात्रता निकषात सुधारणा केल्याचा फायदा; सपना, नितेंद्र सिंग रावतचा समावेश
भारताचा आघाडीचा थाळीफेकपटू विकास गौडासह तीन जणांचे पुढील वर्षी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील स्थान निश्चित झाले आहे. ऑलिम्पिकमधील मैदानी क्रीडा स्पध्रेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, याकरिता आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघात पात्रता निकषामध्ये सुधारणा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या २६ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीमध्ये ऑलिम्पिकच्या दृष्टीने मैदानी क्रीडा स्पध्रेतील १७ प्रकारांमध्ये निकष बदलले आहेत. त्यामुळे गौडासह महिला २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सपना आणि पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये नितेंद्र सिंग रावत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
थाळीफेकसाठी ६६ मीटर हा पात्रता निकष होता, मात्र आता ६५ मीटर हा निकष करण्यात आला आहे. विकासने मे महिन्यात जमैकात झालेल्या निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६५.१४ मीटर अशी कामगिरी करीत हा निकष पार केला होता. त्या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यता होती. ३२ वर्षीय विकासने आशियाई विजेतेपद व २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
विकासने ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण केले असल्याच्या वृत्ताला भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सचिव सी. के. वॉल्सन यांनी दुजोरा दिला आहे.
थाळीफेकीत ६६.२८ मीटर हा राष्ट्रीय विक्रमही विकासच्या नावावर आहे. त्याने जूनमध्ये वुहान (चीन) येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक नोंदवताना ६२.०३ मीटर अशी कामगिरी केली होती. बीजिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याला नववे स्थान मिळाले होते. त्या वेळी त्याने ६२.२४ मीटर अशी कामगिरी केली होती.
१० हजार मीटर मॅरेथॉन आणि चालण्याच्या शर्यतीसाठी १ जानेवारी २०१५ ते ११ जुलै २०१६ हा पात्रतेचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, तर अन्य मैदानी स्पर्धासाठी १ मे २०१५ ते ११ जुलै २०१६ हा कालावधी ठरवण्यात आला आहे.
नोमी सिटी (जपान) येथे १५ मार्चला झालेल्या आशियाई २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या सपनाने एक तास, ३५ मिनिटे, ३६ सेकंद अशी वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले होते. या स्पध्रेसाठी पात्रतेची वेळ आधी एक तास, ३५ मिनिटे होती, ती आता एक तास, ३६ मिनिटे करण्यात आली आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तिसरा भारतीय खेळाडू रावतने गेल्या महिन्यात दिल्ली अर्धमॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकावले होते. ११ ऑक्टोबरला कोरियात झालेल्या जागतिक लष्करी क्रीडा स्पध्रेत दोन तास, १८ मिनिटे, ६ सेकंद अशी वेळ नोंदवत आठवे स्थान मिळवले होते. ऑलिम्पिकसाठी आधी दोन तास आणि १७ मिनिटे असे निकष होते, मात्र आता दोन तास आणि १९ मिनिटे असे सुधारण्यात आले आहे. आतापर्यंत १५ (८ पुरुष आणि ७ महिला) भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
Mazago Mazagaon Dock Ship Builders Mumbai Bharti for various vacant post Till Three April
Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड