आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेत भारताने शानदार सुरुवात केली असून, अव्वल मानांकित विकास कृष्णन (७५ किलो) आणि गौरव बिधुरी (५६ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

विकासने दोन मिनिटांत थायलंडच्या पॅथमसँक कुट्टियाला नमवले. सलामीच्या फेरीत कुट्टियाने विकासच्या डाव्या डोळ्यानजीक ठोसा लावला. पंचांनी सामन्याचा निकाल विकासच्या बाजूने लावण्याअगोदर दोनदा ही लढत थांबवण्यात आली. उपांत्यपूर्व फेरीत विकासची इंडोनेशियाच्या बेटावबून ब्रामाशी गाठ पडणार आहे.

गौरवनेही पहिल्याच लढतीत थायलंडच्या युत्तापाँग टाँगडीला नमवले. पुढील फेरीत गौरवला चीनच्या द्वितीय मानांकित जियावेई हँगशी भिडावे लागणार आहे.

आशियाई युवा रौप्यपदक विजेत्या आशीष कुमारचे (६४ किलो) आव्हान संपुष्टात आले आहे. उझबेकिस्तानच्या इकबोल्जन खोल्डारोव्हने त्याला नमवले. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यामुळे हे तिन्ही बॉक्सिंगपटू उपउपांत्यपूर्व फेरीत खेळत होते.

मंगळवारी चौथा मानांकित शिवा थापा (६० किलो), तिसरा मानांकित सतीश कुमार (+९१ किलो), सहावा मानांकित मनोज कुमार (६९ किलो), मनीष पनवार (८१ किलो) आणि कविंदर सिंग (४९ किलो) यांच्या लढती होणार आहेत.