राष्ट्रकुल स्पर्धेत नववा दिवस भारतासाठी भरभरून पदकांचा नव्हता तरी आशादायी मात्र नक्की होता. शुक्रवारी बॉक्सर पिंकी जांग्राने कांस्यपदकाची कमाई केली, तर गुरुवारी रात्री थाळीफेकीत विकास गौडाने सुवर्णपदकावर नाव कोरले. याशिवाय टेबल टेनिसपटू ए. शरथ कमाल आणि अँथनी अमलराज जोडीने पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत धडक मारत पदक पक्के केले. पारुपल्ली कश्यप आणि पी.व्ही.सिंधू या बॅडमिंटनपटूंनी उपांत्य फेरी गाठत विजयी आगेकूच केली. लॉन बॉल खेळातली कांस्यपदक पटकावण्याची भारताची संधी थोडक्यात हुकली. महिला हॉकी संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले तर पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगवर निलंबनाची कारवाई झाल्याने भारताच्या उपांत्य फेरीतील विजयाच्या आशा धुसर झाल्या आहेत.
अ‍ॅथलेटिक्स
अ‍ॅथलेटिक्ससारख्या हुकमी क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची पीछेहाट होत असताना विकास गौडा याने थाळीफेकीत सुवर्णपदक जिंकले आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
अमेरिकेत सराव करणाऱ्या ३१ वर्षीय विकासने ६३.६४ मीटपर्यंत थाळीफेक केली. मात्र पावसामुळे त्याला स्वत:ची ६६.२८ मीटर ही वैयक्तिक कामगिरी पार करता आली नाही. सायप्रसच्या अ‍ॅपोस्टोलोस पॅरिलीसने ६३.३२ मीटपर्यंत थाळीफेक करीत रुपेरी कामगिरी केली. जमैकाच्या जेस मोर्गन (६२.३४ मीटर) याला कांस्यपदक मिळाले. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा बेन हॅरडीन (६१.९१ मीटर) हा चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. गौडाने २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. या मोसमात त्याने ६५.६२ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती.
महिलांमध्ये मोठय़ा अपेक्षा असलेल्या टिंटू लुका हिने मात्र निराशा केली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. तिने ही शर्यत २ मिनिटे ३.३५ सेकंदांत पार करीत सातवे स्थान घेतले.
बॉक्सिंग
महिलांमध्ये पिंकी जांग्राला कांस्य
भारताची बॉक्सिंगपटू पिंकी जांग्राला महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या रोमहर्षक लढतीत नॉर्दर्न आर्यलडच्या मिखेला वॉल्शकडून तिने ०-२ अशी हार पत्करली. राष्ट्रीय निवड चाचणी स्पध्रेत पिंकीने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमला हरवून भारतीय बॉक्सिंग संघात स्थान मिळवले होते. चार फेऱ्यांच्या या सामन्यात कझाकिस्तान पंचांनी दोन्ही खेळाडूंना ३८-३८ असे गुण दिले. परंतु कॅनडा आणि हंगेरीच्या पंचांनी वॉल्शसाठी अनुकूल असे अनुक्रमे ४०-३६ आणि ३९-३७ गुण दिले. हरयाणाची २४ वर्षीय बॉक्सिंगपटू पिंकी जांग्राने पहिल्या फेरीत तोलामोलाची लढत दिली, परंतु ती एका गुणाने पिछाडीवर पडली. दुसऱ्या फेरीत ही दरी दोन गुणांपर्यंत वाढली. तिसऱ्या फेरीअखेरीस पिंकी तीन गुणांनी पिछाडीवर पडली. चौथी फेरी पिंकीसाठी प्रतिकुल ठरली. तिन्ही पंचांनी वॉल्शच्या बाजूने १०-९ असा कौल दिला.
“वॉल्शने चांगली लढत दिली. माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या. मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवण्यात अपयशी ठरले. वॉल्श माझ्यापेक्षा उंच असल्यामुळे मला तिला पंच मारताना अनेक अडचणी आल्या. मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मी पराभूत झाले.
-पिंकी जांग्रा

टेबल टेनिस
कमाल-अमलराज जोडीचे रौप्यपदक निश्चित
टेबल टेनिसपटू शरथ कमाल आणि अँथनी अमलराज जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदक पक्के केले. टेबल टेनिसमध्ये भारताला मिळणारे हे पहिले पदक असणार आहे.
कमाल व अमलराज जोडीने सिंगापूरच्या यांग झि आणि झान जिआन जोडीवर ११-७, १२-१०, ११-३ अशी मात केली. अंतिम फेरीत या जोडीची सिंगापूरच्याच गाओ निंग आणि लि ह्य़ू जोडीशी मुकाबला होणार आहे.
कमालने दुहेरीतील झंझावाती फॉर्म एकेरीतही कायम राखताना पॉल ड्रिंकहॉलवर ४-१ अशी मात करत उपांत्य फेरीत आगेकूच केली. इंग्लंडच्या एल. पिचफोर्डने सौम्यजीत घोषला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरमीत देसाईला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. सांघिक प्रकारात भारताला पदकाने हुलकावणी दिली होती.
हॉकी
हॉकीमहिलांमध्ये भारताला पाचवे स्थान
भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुलमध्ये पाचवे स्थान मिळवता आले. भारताने यजमान स्कॉटलंड संघावर २-१ असा निसटता विजय मिळवला. अनुपा बार्ला व पूनम राणी यांनी भारताकडून प्रत्येकी एक गोल केला. स्कॉटलंडचा एकमेव गोल निक्की कीड हिने नोंदविला. लागोपाठ दुसऱ्यांदा भारताला महिलांच्या हॉकीत पदक मिळवता आलेले नाही. २००२मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले होते.
या सामन्यातील तीनही गोल उत्तरार्धात नोंदवले गेले. बार्ला हिने भारताचे खाते उघडले. मात्र या आघाडीचा आनंद फार वेळ टिकला नाही. लगेचच स्कॉटलंडच्या कीड हिने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. ही बरोबरीही फार वेळ टिकली नाही. पूनमने जोरदार चाल करत स्कॉटलंडची गोलरक्षक अ‍ॅमी गिब्सनला चकवले आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर भारताला विजय मिळाला. स्कॉटलंड संघाला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले.
भारतीय संघाचे प्रशिक्षक नील हॉवगुड संघाच्या कामगिरीबाबत म्हणाले की, ‘‘या सामन्यात आम्ही विनाकारण गोल स्वीकारला. हा गोल आम्हाला टाळता आला असता. मात्र बचाव फळीतील खेळाडूंची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही.’’
बॅडमिंटन
कश्यप, सिंधू उपांत्य फेरीत
सायना नेहवालच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी असणाऱ्या पारुपल्ली कश्यप आणि पी.व्ही.सिंधू यांनी शानदार कामगिरीसह एकेरी प्रकारात उपांत्य फेरी गाठली. देशासाठी पदक जिंकण्याच्या प्रेरणेने खेळणाऱ्या कश्यपने मलेशियाच्या डॅरेन लिअूवर २१-१३, २१-१४ अशी मात केली. डॅरेनविरुद्धच्या याआधीच्या लढतीत कश्यपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याचप्रमाणे युवा पी.व्ही.सिंधूने न्यूझीलंडच्या ए.रॅनकिनवर २१-१०, २१-९ असा सहज विजय मिळवला. सांघिक प्रकारात दुहेरीची विशेषज्ञ जोडी नसल्याने भारताला पदकाने हुलकावणी दिली होती.
जिम्नॅस्टिक
आशिष कुमारकडून निराशा
भारतीय जिम्नॅस्टिकपटू आशिष कुमारची राष्ट्रकुल स्पध्रेतील वाटचाल अतिशय निराशाजनक अवस्थेत संपुष्टात आली. पुरुषांच्या व्हॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत मॅटवर पडल्याने त्याला अखेरचा क्रमांक मिळाला. २०१०मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पध्रेत आशिषने व्हॉल्ट प्रकारात रौप्य व फ्लोअर प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पध्रेत पदक जिंकणारा तो पहिला जिम्नॅस्टिकपटू ठरला होता. परंतु आपल्या या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करण्यात त्याला अपयश आले.