भारताचा थाळीफेकपटू विकास गौडाने आयएएएफ डायमंड लीग सीरिजमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. ३१ वर्षीय गौडाने पाचव्या प्रयत्नात ६३.९० मीटर लांब थाळी फेकली. २०१३ साली विश्व अजिंक्यपदक स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या पोलंडच्या पिऑर्त मालाचॉवस्की (६४.६५ मी.) आणि पोलंडच्याच रॉबर्ट उर्बनेक (६४.७४ मी.) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
राष्ट्रीय विक्रमवीर गौडाने २०१४मध्ये राष्ट्रकुल स्पध्रेत सुवर्ण आणि आशियाई स्पध्रेत रौप्यपदक पटकावण्याची किमया साधली होती. गौडाने गत महिन्यात कॅलिफोर्निया येथे ६५.७५ मीटर थाळीफेक करून यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याचा राष्ट्रीय विक्रम ६६.२८ मीटर आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेसाठी पात्र ठरण्यासाठी त्याला ६६ मीटरहून अधिक लांब थाळी फेक करावी लागणार आहे.