आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या विकास कृष्णनची भावना
लंडन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या एरॉल स्पेन्सेंकडून व्हिडीओ रिव्हृा मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर बॉक्सिंगमधला रसच जणू मी गमावून बसलो होतो. ग्लोव्हज्कडेही मला पाहायचे नव्हते.. त्यामुळेच मी काही काळ बॉक्सिंगपासून दूर होतो़. परंतु बॉक्सिंग हे माझे पहिले प्रेम असल्यामुळे जिद्दीने पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला.. जणू त्या पराभवानेच उभारी घेण्याचे बळ दिले.. त्यामुळे दणक्यात पुनरागमन करण्यासाठी कसून सराव केला आणि त्याचे चीज झाले.. असे बँकॉकवरून मायदेशी परतलेला विकास सांगत होता. आता त्याला रिओ ऑलिम्पिकचे लक्ष्य खुणावत असून पुढील वाटचालीबाबत त्याने ‘लोकसत्ता’शी खास बातचीत केली.
इंचियॉन येथे झालेल्या आशियाई स्पध्रेत त्याने पुनरागमन करताना कांस्यपदक पटकावले, तर नुकत्याच बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक पटकावून भारतासाठी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने दोहा येथे होणाऱ्या जागतिक स्पध्रेतही प्रवेश निश्चित केला.
आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदक पटकावू शकलो असतो, असे तो म्हणाला. ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत उजबेकिस्तानच्या बेक्तमीर मेलिकुझीएव्हकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे विकासला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ‘‘या स्पध्रेतून चांगला अनुभव मिळाला. अंतिम फेरीपर्यंत अव्वल दर्जाच्या प्रतिस्पध्र्याचा सामना करायला मिळाला नाही, हेही तितकेच खरे. अंतिम फेरीतील प्रतिस्पध्र्याने माझी कसोटी पाहिली. याहून अधिक चांगली कामगिरी करता आली असती. या कामगिरीवर मी नाखूश आहे, कारण मी सुवर्णपदकासाठी खेळत होतो,’’ असे विकासने सांगितले.
मात्र, या कामगिरीच्या बळावर विकासने जागतिक स्पध्रेची पात्रता मिळवली आहे आणि या स्पध्रेतून रिओ ऑलिम्पिकसाठीचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे येथे सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य त्याने डोळ्यांसमोर ठेवले आहे. तो म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रशिया, क्यूबा, उजबेकिस्तान, कझाकस्तान आदींच्या अव्वल बॉक्सिंगपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. हे आव्हान खडतर आहे, मात्र अशक्य नाही. या स्पध्रेतून रिओत प्रवेश करण्याचे लक्ष्य आहे.’’
जागतिक बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाची मान्यता काढून घेतल्यानंतर स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाला (बीआय) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) मान्यता नाकारली. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तिरंग्याखाली सहभाग घेता येत नसून राष्ट्रीय स्पर्धानाही खीळ बसली आहे. त्यावर विकास म्हणाला, ‘‘भारतात बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या घोळामुळे खेळाडूंना पुरेशा स्पर्धामध्ये सहभाग घेता येत नाही आणि ते खेळाडूंसाठी गैरसोयीचे आहे. या वादाचा आमच्या कामगिरीवर परिणाम होतो. हा वाद अधिक काळ राहणार नाही, याची खात्री असून लवकरच आम्ही तिरंग्याखाली खेळू.’’
विजेंदर सिंग व्यावसायिक बॉक्सिंगकडे वळल्यानंतर रिक्त झालेली मिडलवेट गटाची जागा विकासने भरुन काढली. त्यावर तो म्हणाला, ‘‘विजेंदरनंतर ही जागा मला मिळाले याचा अभिमान वाटतो. या गटात स्वत:ला सिद्ध करेन, असा आत्मविश्वास आहे. याच गटात कांस्य व रौप्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे आणि सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न असेल.’’
भारतात बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या घोळामुळे खेळाडूंना पुरेशा स्पर्धामध्ये सहभाग घेता येत नाही आणि ते खेळाडूंसाठी गैरसोयीचे आहे. या वादाचा आमच्या कामगिरीवर परिणाम होतो. हा वाद अधिक काळ राहणार नाही, याची खात्री असून लवकरच आम्ही तिरंग्याखाली खेळू.