भारताची तीन कांस्यपदकांची कमाई
भारताच्या विकास आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील ७५ किलो गटात अंतिम फेरी गाठली. त्याचे सहकारी सतीशकुमार (९१ किलोवर), एल. देवेंद्रसिंग (४९ किलो) व शिवा थापा (५६ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
विकासने इराकच्या वाहिद अब्दुलरिधावर ३-० अशी मात केली. त्याला अंतिम फेरीत उजबेकिस्तानच्या बेक्तेमीर मेलिकुझिनोव याच्याशी झुंजावे लागणार आहे.
सतीशकुमार (९१ किलोवर), एल. देवेंद्रसिंग (४९ किलो) व शिवा थापा (५६ किलो) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे त्यांचे कांस्यपदक यापूर्वीच निश्चित झाले होते. तसेच त्यांनी जागतिक स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला होता. त्यांच्याबरोबरच मदनलाल (५२ किलो) व मनोजकुमार (६४ किलो) यांनाही जागतिक स्पर्धेचे तिकीट लाभले आहे.
विकास याने वाहिद याच्याविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक चाली केल्या. त्याने पहिल्या फेरीत आपल्या प्रतिस्पध्र्यास बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. दुसऱ्या फेरीत वाहिद याने केलेल्या चुकांचा विकासला फायदा झाला. विकासच्या आक्रमक खेळापुढे वाहिदचा बचाव निष्प्रभ ठरला.
भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग यांनी विकासच्या यशाबद्दल कौतुकास्पद उद्गार व्यक्त करीत सांगितले, विकास हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याचे अन्य सहकारी बाद होत असताना त्याने भारतीय पथकात चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे. आता अंतिम फेरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचा प्रतिस्पर्धी बलाढय़ खेळाडू असला तरी विकासच्या शैलीबाबत मला खात्री आहे. तो ही लढतजिंकेल अशी मला आशा आहे.