मुंबईचे माजी यष्टीरक्षक विनायक सामंत यांच्याकडे आगामी स्थानिक हंगामासाठी मुंबईचे प्रशिक्षकपद कायम ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या सूत्रांनी दिली.

याआधी मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव सुलक्षण कुलकर्णी यांच्यापुढे ठेवण्यात आला होता, परंतु मानधनाबाबत समाधान न झाल्यामुळे त्यांनी हे पद नाकारले होते. गेल्या वर्षी सामंत यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे देण्यात आली. मुंबईच्या संघाने दिल्लीला नमवून विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा जिंकली. मात्र रणजी करंडक आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला.

सामंत यांना २१ ऑगस्टला नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. ते मंगळवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीत पदभार स्वीकारतील. बापूना चषक स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे शिबीर येथे सुरू होणार आहे.

सामंत यांनी १०१ प्रथमश्रेणी सामन्यांत ३४९६ धावा केल्या आहेत, तर ३७ यष्टीचीत आणि ३१० झेल त्यांच्या नावावर आहेत. नाबाद २०० ही त्यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.