इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारी विनेश फोगटने आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. लखनऊ येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबीरात विनेशला दुखापत झाल्यामुळे तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. विनेशची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या कोपराला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे, यामुळे डॉक्टरांवनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचं कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

विनेश ही सध्याच्या घडीला भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी कुस्ती महासंघाने विनेशला पात्रता फेरी न खेळण्याची मूभा दिली होती. हंगेरीत होत असलेल्या स्पर्धेत विनेश ५० किलो वजनी गटात खेळणार होती. मात्र तिच्या दुखापतीमुळे भारताला हक्काच्या पदकावर पाणी सोडावं लागणार आहे. विनेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या दुखापतीची माहिती दिली आहे.