जागतिक कुस्ती स्पर्धा

विनेश फोगट (५३ किलो) आणि सीमा बिस्ला (५० किलो) या दोघींकडून भारताला जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदकाच्या आशा कायम आहेत. दोघींच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे त्यांना रॅपिचेजद्वारे पदकाचे स्वप्न साकारता येऊ शकते.

जपानच्या विश्वविजेत्या मायू मुकैदाकडून पराभवामुळे भारताची आघाडीची मल्ल विनेश च्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. परंतु मायूने अंतिम गाठल्यामुळे विनेशच्या कांस्यपदकाच्या आणि ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा कायम आहेत.

रॅपिचेज फेरीत विनेशला तीन विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. युलिआ खावाल्डझाय ब्लाहिनया (युक्रेन), जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील सराह अ‍ॅन हिल्डेब्रँड आणि मारिया प्रीव्होलाराकी (ग्रीस) या तिघांना नमवल्यास विनेशला पहिलेवहिले जागतिक पदक जिंकता येईल. याचप्रमाणे तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्यास टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रसुद्धा होता येईल.

यंदाच्या हंगामात विनेशने दोन वेळा जागतिक विजेत्या मायूकडून दुसऱ्यांदा पराभव पत्करला आहे. याआधी चीनमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने हार पत्करली होती. या लढतीनंतर मायूने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली.

अन्य ऑलिम्पिक गटात सीमा बिस्लाने तीन ऑलिम्पिक पदकविजेत्या मारिया स्टॅडनिककडून २-९ अशा फरकाने पराभव पत्करला. अझरबैजानची मारियासुद्धा अंतिम फेरीत पोहोचल्याने सीमाच्या पदकाच्या आशा जिवंत आहेत. सीमाला आता मीसिनेई मर्सी जेनेसिस, यासर डोगू आणि सन यानान यांच्याशी सामना करावा लागणार आहे. ललिता आणि कोमल गोळे यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी अनुक्रमे बोलोर्टुया आणि अल्टूग या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या आहेत.

आव्हानात्मक अशा ५३ किलो वजनी गटात विनेशने वर्चस्वपूर्ण सुरुवात केली आणि रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा १३-० असा पराभव केला. त्यानंतर मायूविरुद्धच्या लढतीत मात्र विनेश आक्रमकता दाखवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे मायूने ७-० असा विजय मिळवला.

ग्रीको-रोमनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. १३० किलो वजनी गटाच्या रेपिचेज फेरीत ईस्टोनियाच्या हेयकी नबीने नवीनविरुद्ध तांत्रिक गुणांआधारे पराभव केला.

पूजाकडून पदकाची आशा

वर्षभरापूर्वी जागतिक कांस्यपदक मिळवणाऱ्या पूजा धांडाकडून ५९ किलो वजनी गटात पदकाच्या आशा आहेत. उपउपांत्यपूर्व फेरीत बुधवारी तिची बेलारशियाची हांचर यानूशी गाठ पडणार आहे.

जपान ही कुस्तीमधील महासत्ता आहे. त्यामुळेच या खेळाडूंवर वर्चस्व गाजवणे आव्हानात्मक ठरते. एक तंत्र, एक रणनीती किंवा एक गुण सामन्याचे चित्र पालटू शकतो. माझे प्रयत्न अपयशी ठरले, तर मायू यशस्वी ठरली. परंतु माझे आव्हान अद्याप संपुष्टात आलेले नाही.

– विनेश फोगट