साक्षी मलिकचा अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज

नवी दिल्ली : जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगटची खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे. रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेली विनेश ही सध्या भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे. गेल्या वर्षीदेखील खेलरत्नसाठी तिची शिफारस झाली होती. मात्र कुस्तीपटू बजरंग पूनियाला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. गेल्या तीन वर्षांत विनेशची सातत्यपूर्ण कामगिरी झाली आहे. जकार्ता येथे आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, २०१९मध्ये नूर सुलतान येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, या वर्षांच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे आशिया कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अशी कामगिरी विनेशने केली आहे. ‘‘खेलरत्नसाठी विनेश फोगटचे नाव निश्चित आहे. मात्र अर्जुन पुरस्काराबाबतचा निर्णय सोमवापर्यंत घेऊ,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

साक्षी मलिकला २०१६ मध्ये खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मात्र तरीदेखील तिने अर्जुन पुरस्कारासाठी निवड व्हावी असा अर्ज पाठवला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांतील साक्षीची कामगिरीही चांगली झालेली नाही. आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतही तिला प्रवेश घेता आला नव्हता. याउलट अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेसह संदीप तोमर आणि दीपक पूनिया यांची नावे चर्चेत आहेत.