नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० अशा दोन्ही मालिका जिंकल्या. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. त्याच्या निवृत्तीवरून क्रिकेटच्या वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. अशातच शेवटच्या टी-२० समान्यामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शेवटच्या निर्णायक सामन्यातील शेवटच्या निर्णयाक षटकात नेतृत्वाची धुरा धोनीच संभाळत असल्याचे दिसते. आणि त्याच वेळी भारतीय संघाचा औपचारिक कर्णधार विराट कोहली सीमारेषेजवळ एखाद्या सामान्य खेळाडूप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना दिसतो.

दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीला आल्यानंतर आवश्यक धावगतीपेक्षा कमी वेगाने धावा केल्यामुळे या पराभवाचे खापर अनेकांनी धोनीच्या माथी फोडले. मात्र नेहमीप्रमाणे शब्दांने उत्तर देण्याऐवजी धोनीने कृतीतून उत्तर देणे पसंत करत तिसरा समाना आपल्या निर्णयक्षमतेच्या जोरावर विजयाकडे नेला.  ट्विटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये थिरुअनंतपुरममधील शेवटच्या टी-२० समान्यातील शेवटच्या षटकामधील मैदानावरील हलचाली टिपण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडला शेवटच्या षटकामध्ये १९ धावांची गरज होती. त्यावेळी कोहली आणि धोनीमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि जगातील सर्वोत्तम फिनीशर म्हणून लोकप्रिय असणाऱ्या धोनीने त्याचे आवडते फिनीशींगचे काम आपल्या हाती घेतले. फरक फक्त इतकाच होता की तो यष्ट्यांमागून फिनिशींग करत होता. धोनीने क्षेत्ररक्षण लावण्यास सुरुवात केली आणि कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी निघून गेला. शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली. पहिल्या तीन चेंडूमध्ये हार्दिकने ८ धावा दिल्या. त्यानंतर धोनीने हार्दिकला कशाप्रकारचा चेंडू टाक याबद्दल काही टिप्स दिल्या. त्यानंतरच्या ३ चेंडूंवर ११ धावांची आवश्यकता असणाऱ्या न्यूझीलंडला केवळ ५ धावाच करता आल्या आणि भारताने सहा धावांनी हा सामना जिंकत सामना आणि मालिका दोन्ही आपल्या खिशात टाकले.

धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर नेतृत्वाची धूरा कोहलीच्या हातात आल्यानंतरदेखील मैदानावर असताना धोनीचा सल्ला संघासाठी खूपच महत्वाचा असतो असे अनेक निर्णयांमधून दिसून आले आहे. १० पैकी ९ वेळा धोनीने दिलेला सल्ला योग्य काम करतो असे कोहलीच एकदा म्हणाला होता.