एका चेंडूत सहा धावा हव्या असताना क्रिकेट सामन्याचा रोमांच टिपेला पोहोचलेला असतो. शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याशिवाय फलंदाजाला काहीच पर्याय नसल्यामुळे फलंदाज षटकार मारणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष असते. पण अशा वेळी गोलंदाजानेच सहा वाईड चेंडू टाकले तर…. अशी घटना नुकतीच ठाणे जिल्हयात घडली आहे. एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत घडलेलय या घटनेचा व्हिडीओ चांगलंच व्हायरल होताना दिसतो आहे.

ठाणे जिल्ह्यातील एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. त्यावेळी गोलंदाजाने सलग सहा वाईड चेंडू टाकल्याने प्रतिस्पर्धी संघ चक्क १ चेंडू राखून जिंकला. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील स्थानिक स्पर्धेचा तो सामना होता. पडलगावच्या आदर्श क्रिकेट क्लबच्या मैदानावर या स्पर्धेत प्रत्येकी पाच षटकांचे सामने खेळवले जात होते. त्यात जुनी डोंबिवली विरुध्द देसाई क्लब असा सामना होता. यात जुनी डोंबिवली संघाने देसाई संघाला ७६ धावांचे लक्ष्य दिले होते.

त्यानंतर जुनी डोंबिवली संघाने चार गडी गमावले, परंतु सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी षटकाराचीच गरज होती. अशा वेळी हे नाट्य घडले. जुनी डोंबिवलीच्या गोलंदाजाने एक-दोन नव्हे, तर लागोपाठ सहा चेंडू वाईड टाकले आणि देसाई संघाने चक्क एक चेंडू शिल्लक राखून नाट्यमयरित्या जिंकला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.