आयपीएलचा यंदाचा हंगाम चेन्नईच्या संघाने गाजवला. त्यांनी दोन वर्षाच्या बंदीनंतर दमदार पुनरागमन केले. आयपीएलच्या अंतिम सामन्यात सलामीवीर शेन वॉटसनने पूर्ण हंगामाची कसर भरून काढली आणि शानदार शतक झळकावले. पण चेन्नईला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात सलामीवीर अंबाती रायडूचे मोठे योगदान होते.

दीर्घकाळ मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर यंदाच्या वर्षी मुंबईने अंबाती रायडूला खरेदी केले नाही. त्यामुळे तो धोनीच्या चेन्नईकडून खेळला. चेन्नईने रायडूला २ कोटी २० लाखांत विकत घेतले. आणि त्याने चेन्नईमधील आपली निवड सार्थ ठरवली. चेन्नईकडून खेळताना चांगली लय राखत १६ सामन्यांमध्ये ४३च्या सरासरीने ६०२ धावा केल्या. यात एक शतक आणि ३ अर्धशतके समाविष्ट होती. त्याच्या आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले.

मात्र आयपीएलचे हे यश रायडूने स्वतःच्या नव्हे तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या बॅटमुळे मिळवले आणि त्याच्या शिव्याही खाल्ल्या. रायडूने स्वतः याबद्दल सांगितले. हरभजन सिंग याने घेतलेल्या मुलाखतीत त्याने याबाबतचा खुलासा केला. तो म्हणाला की दरवर्षी मी विराट कोहलीकडे एक बॅट मागतो. विराटच्या बॅटने माझा खेळ चांगला होतो. त्यामुळे विराटकडून मी प्रत्येक वर्षी नवीन बॅट घेतो.

मुख्य म्हणजे, आयपीएलसाठी मी आणि विराट हे प्रतिस्पर्धी संघातून खेळत असतो. तरीही तो मला बॅट देतो. तसेच या वर्षीही मी त्याच्याकडे बॅट मागण्यासाठी गेलो. तेव्हा त्याने मला शिव्या दिल्या आणि मग बॅट दिली. त्याने तसे केले असले तरी हे सारे खेळकर स्वरूपाचे होते आणि मजेत चालू होते, असेही रायडूने सांगितले.