आयपीएलचा तेरावा हंगाम आटपून पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत प्ले-ऑफचे सामने खेळण्यासाठी गेलेल्या फाफ डु-प्लेसिसने बाबर आझमचं कौतुक केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत बाबर आझमने आपल्या खेळाने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं आहे. अनेकदा बाबर आझम आणि विराटची तुलना देखील होते. विराट कोहलीचे चाहते बाबर आझमला चांगल्या दर्जाचा खेळाडू मानत नसले तरीही दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये CSK चं प्रतिनिधीत्व करणाऱ्या फाफ डु-प्लेसिसला विराट आणि बाबर यांच्यात बरंच साम्य आढळतं.

पेशावर संघाकडून खेळत असताना डु-प्लेसिसने ३१ धावांची खेळी केली. यावेळी बाबर आझमच्या खेळीचं कौतुक करत असताना डु-प्लेसिसने टी-२० क्रिकेटमध्येही बाबर आश्वासक खेळी करु शकतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. “मला विराट आणि बाबरमध्ये बरंच साम्य आढळतं. ते दोघंही चांगले खेळाडू आहेत. गेल्या काही वर्षांतला त्याचा खेळ पाहिला तर बाबर आझमने सर्वोत्तम खेळाडू बनण्याकडे आपला प्रवास सुरु केला आहे.”

काही दिवसांपूर्वी बाबर आझमला पाकिस्तानच्या वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने कसोटी संघआचं कर्णधारपदही बाबरकडे सोपवलं आहे.