यष्टीरक्षक ऋषभ पंतची फलंदाजी आणि यष्टींमागची खराब कामगिरी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून भारतीय संघाने नवीन प्रयोग करत लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. ऋषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती, त्यातच लोकेश राहुलने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत…यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणी सांभाळायची?? या चर्चेला वाट मोकळी करुन दिली. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणावर आपलं मत नोंदवलं आहे.

“विराट कोहलीने निर्णय घेतला आहे. लोकेश राहुल यष्टीरक्षण करेल हा कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये राहुलची कामगिरी चांगली राहिलेली आहे. कसोटीतही त्याने चांगली सुरुवात केली पण मध्यंतरी त्याची कामगिरी जराशी खालावली होती. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो अशीच चांगली कामगिरी करत राहिल अशी अपेक्षा आहे, पण यष्टीरक्षण कोणी करायचं हा सर्वस्वी विराट आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे”, सौरव गांगुली ABP News शी बोलत होते.

अवश्य वाचा – पाकिस्तान BCCI ची कोंडी करण्याच्या तयारीत 

दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर लोकेश राहुलनेही आपल्याला नवीन जबाबदारी आवडत असल्याचं म्हटलं होतं. विराट कोहलीनेही आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून संघातला समतोल राखणं महत्वाचं असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे आगामी काळात पंतला भारतीय संघात पुन्हा कधी संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या निवृत्तीची घटका समीप, प्रशिक्षक रवी शास्त्रींचं सूचक विधान