इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत अनेक देशांतील अव्वल खेळाडू खेळतात. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात मायदेशातील वातावरणाचा फायदा भारताला उठवता येणार नाही, अशी कबुली दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दिली.

‘‘गेली आठ-नऊ वष्रे जगभरातील अनेक क्रिकेटपटू भारतात आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे त्यांना भारतामधील वातावरणाचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत या गोष्टीचा प्रत्यय आम्हाला आला आहे. परदेशी खेळाडूंना भारतीय वातावरणात कोणते फटके खेळावेत आणि कशी गोलंदाजी करावी, याचे तंत्र अवगत झाले आहे,’’ असे मत कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या चर्चेत मांडले.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील प्रत्येक संघ हा चांगला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी म्हणून प्रत्येकाचा आदर करणे आवश्यक आहे,’’ असे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले.

दडपणाखाली स्वत:ला शांत कसे ठेवायचे, याची शिकवण महेंद्रसिंग धोनीकडून घेतली. एक कर्णधार म्हणून त्याने आदर्श ठेवला आहे. विश्वचषकाप्रमाणेच त्याला शक्य झाले ते त्याने जिंकले आणि एकदिवसीय, कसोटी आणि ट्वेंटी-२० प्रकारातील अव्वल स्थानही त्याने संघाला मिळवून दिले. इतर कर्णधारांना साध्य करण्यासाठी त्याने काहीच ठेवले नाही.
-विराट कोहली, भारताचा फलंदाज