भारतीय कर्णधार विराट कोहली याला मणक्याच्या दुखण्यामुळे काऊंटी क्रिकेटला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयने या संदर्भात गुरुवारी माहिती दिली. या बातमीनंतर अनेकांनी याबाबत टीकेचा सूर लावला. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटची पाठराखण केली आहे. विराट हा मशीन नाही. त्यालाही विश्रांतीची गरज आहे, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत विस्तृत बोलताना शास्त्री म्हणाले की विराट हा मशीन नाही, तर माणूस आहे. तो ‘टॉप डॉग’ नाही. विराटमध्ये इंधन भरून त्याला खेळण्याची सक्ती करता येऊ शकत नाही. आणि ‘टॉप डॉग’लाही इंधन भरून खेळायला पाठवता येत नाही, असेही शास्त्री म्हणाले. विराट ज्यावेळी काऊंटी क्रिकेट खेळणार हे समजले, त्यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली याने विराटला ‘टॉप डॉग’ असे संबोधले होते. त्यावर शास्त्रींनी हे उत्तर दिले.

विराट सरे या संघाकडून जून महिन्यात तीन काऊंटी सामान्यांसह सहा सामने खेळणार होता. मात्र विराटच्या दुखापतीनंतर आता त्याची ‘काऊंटी’वारी रद्द झाली. याबाबत सरे संघ व्यवस्थापनाचे संचालक अॅलेक स्टुअर्ट यांनी मत व्यक्त केले. ‘विराट कोहलीने काऊंटीतून माघार घेतला हे ऐकून दुःख झाले. पण दुखापत ही खेळाडूला कधीही होऊ शकतो. आम्ही हे समजू शकतो. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने विराटला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आणि आम्ही त्या निर्णयच आदर राखतो, असे ते म्हणाले.