16 December 2017

News Flash

Video : दिल्लीत टीम इंडियाचे ट्रिपल सेलिब्रेशन!

भारतीय संघातील खेळाडूंची धम्माल

ऑनलाइन टीम | Updated: December 7, 2017 11:35 AM

टीम इंडियाची ड्रेसिंगरुममध्ये धम्माल

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रंगलेला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. भारताने दिल्ली सामना जिंकण्याची संधी दवडली असली, तरी नागपूर कसोटीतील विजयामुळे भारताने मालिका १-० अशी खिशात घातली. या सामन्यातील दुसऱ्या डावातील सर्वोच्च खेळी करत सलामीवीर शिखर धनवनने ५ डिसेंबरला मैदानात बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी ड्रेसिंगरुममध्ये धवनचा वाढदिवस साजरा केला. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा वाढदिवस होता. ६ डिंसेंबरला मैदानात उतरल्यानंतर भारताकडून सर्वाधिक तीन बळी मिळवत त्यानेही शिखर धवन प्रमाणेच वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीच्या मैदानावर चांगली कामगिरी केली.

भारतीय संघाने या दोन्ही खेळाडूंच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेली धम्माल बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धवनसह भारताच्या डावाची सुरुवात करणारा मुरली विजय धवनच्या चेहऱ्याला केक लावताना दिसत आहे. याशिवाय धवन चेतेश्वर पुजाराला केक भरवताना दिसतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाडेजाने पहिला घास कर्णधार विराट कोहलीला भरवल्याचे दिसते. या दोन शिलेदारांच्या बर्थडे सेलिब्रेशन सोबतच श्रीलंकेविरुद्धची मालिका १-० अशी जिंकत भारताने दिल्लीच्या मैदानात तिहेरी आनंद साजरा केला.

या कसोटी मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या आगामी मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जशी कामगिरी केली त्याची पुनरावृत्ती करण्यास तो उत्सुक असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मोहालीच्या मैदानात रंगणार आहे.

First Published on December 7, 2017 11:32 am

Web Title: virat kohali and team india huge celebration shikahr dhavan ravindra jadeja birthday affter win series video