दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात कर्णधार विराट कोहलीनं धोनीच्या आठवणींना उजाळा दिला. दिल्ली कसोटीतील दुसऱ्या दिवशी शहरातील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन खेळाडू तोंडाला मास्क बांधून मैदानात उतरले होते. दरम्यान विराट आणि अश्विन मैदानात असताना श्रीलंकन कर्णधार चंडिमलनं सामना थांबवण्याची विनंती पंचांना केली. यासाठी चंडिमलसह श्रीलंकन खेळाडूंनी पंचांभोवती गराडा घातल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकन संघ सामना थांबण्याची विनंती करत असल्यामुळे खेळ १० ते १५ मिनिटे थांबला होता. यावेळी द्विशतकवीर विराटने मैदानात झोपून विरंगुळा घेतला.

विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना धोनीनं अशाच अंदाजात क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. श्रीलंकेत रंगलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात धोनी मैदानात कुल अंदाजात विरंगुळा घेताना पाहायला मिळाले होते. भारताचा विजय दृष्टिक्षेपात आल्यानंतर मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या फेकत आपला रोष व्यक्त केल्यानंतर पंचांनी अर्ध्या तासासाठी खेळ थांबवला होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि धोनी मैदानात होते. आणखी एक विशेष म्हणजे तो दिवस तो सामनाही रविवारीच खेळवण्यात आला होता. श्रीलंका दौऱ्यातील या सामन्यात रोहित शर्माचे शतक आणि महेंद्रसिंह धोनीची अर्धशतकी खेळीनं भारताने हा सामना ६ गडी राखून विजयी मिळवला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेसह कसोटी मालिका एकहाती खिशात घातली होती. धोनीच्या मैदानावरील विरंगुळ्यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत विराट कोहलीनं धोनीच्या अंदाजात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे द्विशतक आणि मुरली विजयचे शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ७ बाद ५३६ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. डावाला सुरुवात होताच तीन गडी गमावले होते.