मी दुखापतीतून १०० टक्के तंदुरुस्त झालो असून आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झालो आहे. आमचा संघ आता आक्रमणासाठी पूर्णपणे तयार आहे, असा विश्वास भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमवेत इंग्लंड दौऱ्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. ३ जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विराट इंग्लंमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याला काऊंटी स्पर्धेत सहभागी होता आले नाही.

आज या सर्व गोष्टींबाबत विराट कोहलीने आपली मते मांडली. ‘मी दुखापतीतून आता पूर्णपणे सावरलो आहे. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये खेळून तेथील परिस्थितीशी एकरूप होणे हा माझा उद्देश होता. पण पूर्णपणे तंदुरुस्त नसताना मी तेथे खेळण्यास गेलो नाही, हे माझे सुदैवच. कारण ९० टक्के तंदुरुस्त असताना क्रिकेट न खेळणे हे कधीही चांगले असते. पण आता मी १०० टक्के तंदुरुस्त आहे आणि इंग्लंडशी दोन हात करण्यास सज्ज आहे, असे त्याने म्हटले आहे.

कोहली यंदाच्या काऊंटी क्रिकेटमध्ये सरे या संघाकडून खेळणार होता. पण आयपीएल दरम्यान कोहलीच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला काऊंटी स्पर्धेला मुकावे लागले. तसेच, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीलाही मुकावे लागले.

माझ्या मानेला दुखापत झाली होती. मात्र आता मी त्यातून सावरलो आहे. मी मुंबईत ६ ते ७ सराव सत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने सराव करू शकलो आहे. अशा पद्धतीच्या विरामानंतर तुम्हाला मानसिकदृष्टया ताजेतवाने होण्यास मदत होते. या विश्रांतीनंतर आता मी मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही विजय मिळवण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहोत. केवळ फेरफटका मारणे आणि कॉफीचा आस्वाद घेणे, हा आमच्या दौऱ्याचा हेतू नाही. त्यामुळे मैदानात उतरल्यावर आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असेही कोहलीने स्पष्ट केले.