भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने २००८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले. संघाचे नेतृत्व करायला सुरूवात केल्यापासून तर त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. १८ ऑगस्टला त्याला आतंरराष्ट्रीय क्रिकेमध्ये १२ वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंत विराटने धडाकेबाज कामगिरी करत ७० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत. त्याने त्याची हीच लय कायम ठेवत आणखी १० वर्षे क्रिकेट खेळत राहावं, अशी इच्छा भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केली आहे.
विराटसाठी आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. आज विराटने इन्स्टाग्रामवर हजारावी पोस्ट शेअर केली आहे. २००८ च्या सामन्यातील अगदी तरूणपणातला एक फोटो आणि लॉकडाउन आधी खेळलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी गणवेशातील एक फोटो असे दोन फोटो अतिशय छान पद्धतीने मर्ज करून विराटने एक फोटो पोस्ट केला आहे. “२००८ – २०२०, क्रिकेटच्या प्रवासात मी रोज नवनवीन गोष्टी शिकतो आहे. या प्रवासात आतापर्यंत तुम्हा साऱ्यांचं प्रेम आणि पाठिंबा मिळाला यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. ही घ्या माझी इन्स्टाग्रामवरील १०००वी पोस्ट!”, अशी कॅप्शन त्याने खास फोटोखाली लिहिली.
या फोटोवर कमेंट करताना हरभजन सिंगने त्याला, “तू २०३० पर्यंत म्हणजेत आणखी १० वर्षे असाच दमदार खेळत राहा”, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. याच फोटोवर अनुष्कानेदेकील कमेंट केली आहे. तिने दोन लाल बदामाचे इमोजी पोस्ट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडल्यापासून विराटने अनेक प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. त्यापैकी आज केलेली पोस्ट ही त्याची १०००वी पोस्ट ठरली. सध्या विराटचे इन्स्टावर ६९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 7:20 pm