पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकापूर्वी संघात सुयोग्य संतुलन साधले जाणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी सर्वानी मिळून प्रयास करणे गरजेचे असल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने मालिका पराभवानंतर व्यक्त केले आहे.

‘‘अशा प्रकारच्या निर्णायक सामन्यांमध्ये झालेली कामगिरी पाहता येत्या विश्वचषकासाठी आपल्यात खूप सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले. आपण क्रिकेटमधील कोणत्याही एका कौशल्यावर फार काळ अवलंबून राहू शकत नाही. हे या पराभवाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर संतुलन राखण्यासाठी प्रयास करावे लागणार आहेत,’’ असे कोहलीने सांगितले.

भारतीय संघाची फलंदाजी सर्वाधिक मजबूत मानली जात असताना प्रत्यक्षात भारतीय संघ त्यातच कमी पडल्याचे या सामन्यात दिसून आले. विशेषत्वे भारताची मध्यफळी तितकी दमदार कामगिरी करीत नसल्याने प्रत्येकवेळी संघाची सलामीची जोडी आणि कोहलीवरच संघ विजयासाठी अवलंबून राहात असल्याचे दिसून आले. ३१व्या षटकापर्यंत भारतीय संघाच्या ४ बाद १५६ धावा झाल्या होत्या. त्यानंतरच्या अखेरच्या २० षटकांमध्ये भारताला केवळ १०० धावाच करणे शक्य झाले.

‘‘या सामन्यात भारताने पुरेशी धावसंख्याच उभारली नव्हती. सुमारे २५ ते ३० धावा कमी पडल्या. त्या तुलनेत इंग्लंडच्या संघाने अगदी यथायोग्य कामगिरी बजावल्याने त्यांना विजय मिळणे क्रमप्राप्तच होते,’’ असेही कोहलीने सांगितले. ‘‘रशीदने टाकलेला चेंडू खरोखरच अप्रतिम होता आणि त्यावर मी चकलो. मी त्याच्याविरुद्ध १९ वर्षांखालील संघापासून खेळत आलो आहे. मात्र, यावेळचा त्याचा चेंडू खूपच वळल्यानेच चकित झालो,’’ असे कोहली म्हणाला.

आम्ही चुकांमधून शिकलो -मॉर्गन

प्रारंभीच्या दोन सामन्यांतील चुकांमधून धडा घेत आम्ही तिसऱ्या सामन्यात कामगिरी उंचावली. तसेच सर्वच आघाडय़ांवर संतुलित कामगिरी केल्याने हा विजय मिळाल्याची भावना इऑन मॉर्गन याने व्यक्त केली. या मालिकेतील आमची सुरुवात खराब झाली होती. मात्र, त्यानंतर आम्ही खेळ उंचावत नेण्यात यशस्वी ठरलो. सातत्याने खेळाचा स्तर उंचावणे ही खूपच आनंदाची बाब असून त्यामुळेच ही मालिका जिंकल्याचा आनंद वेगळाच असल्याचे मॉर्गनने नमूद केले.

कोहलीचे अव्वल स्थान भक्कम

दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला सुरेख फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही कायम राखला आहे. त्याचेच फळ म्हणून एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतील अव्वल स्थान त्याने कारकीर्दीतील सर्वोच्च अशा ९११ गुणासंह आणखी भक्कम केले आहे. फिरकीपटू कुलदीप यादवलाही त्याच्या अप्रतिम कामगिरीचा लाभ झाल्यामुळे कारकीर्दीत पहिल्यांदाच त्यानेही गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे.

कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांत अनुक्रमे ७५, ४५, व ७१ धावा काढल्या. त्यामुळे त्याला दोन गुणांचा फायदा होऊन कारकीर्दीत प्रथमच त्याने ९११ गुणांची कमाई केली. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्सने मार्च १९९१मध्ये ९१८ गुण मिळवण्याची करामत केली होती. कुलदीपने तीन एकदिवसीय लढतीत नऊ बळी घेण्याची किमया साकारली होती. त्यामुळे त्याने थेट १५व्या स्थानावरून सहावे स्थान गाठले.