अजिंक्य रहाणेला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत करुण नायरला संधी मिळाली. त्रिशतकी खेळी साकारत करुणने या संधीचे सोने केले. त्रिशतक झळकावणे ही अद्भुत गोष्ट आहे. मात्र एका खेळीसाठी अजिंक्यचे दोन वर्षांचे योगदान विसरून चालणार नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी अजिंक्य रहाणेचा अंतिम संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान अजिंक्यच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र आता दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याने त्याची संघात निवड करण्यात आली आहे. त्रिशतकी खेळी केल्यानंतरही पुढील कसोटीत अंतिम संघात संधी न मिळण्याचा दुर्मीळ विक्रम करुणच्या नावावर होऊ शकतो.

‘‘एका खेळीने दोन वर्षांचे योगदान बाजूला सारता येणार नाही. गेल्या दोन वर्षांत अजिंक्यचे भारतीय संघाच्या विजयातील योगदान लक्षात घ्यायला हवे. कसोटी प्रकारातील त्याची सरासरी जवळपास पन्नास आहे. या प्रकारातील तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे,’’ असे कोहलीने स्पष्ट केले.

कुलदीप यादवला संधी मिळणार आहे का याविषयी विचारले असता कोहली म्हणाला, ‘‘कुलदीप प्रतिभाशाली खेळाडू आहे. मात्र भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्यासाठी त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा आणि जयंत यादव हे चारही फिरकीपटू दमदार प्रदर्शन करत आहेत.’’