विराट कोहलीच्या दुखापतीमुळे यजमान भारतावर दडपण; ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी आजपासून

सामन्यांमधील रंगत, मैदानावरील आणि बाहेरील वादविवाद, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रतिमा डागाळण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आदी गोष्टींमुळे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेने आधीच कळस गाठला आहे. उत्तरेच्या पर्वतराजींवर वसलेल्या धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेचा चौथा आणि निर्णायक कसोटी सामना रंगणार आहे. त्यामुळे थंडगार हवामानाचे हे ठिकाणसुद्धा क्रिकेटमुळे तापले आहे. ‘क्रिकेटविश्वातील ट्रम्प’ असा शिक्का जरी काही ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकारांनी भारतीय संघनायक विराट कोहलीवर मारला असला तरी ते भारताच्या यशाचे ‘ट्रम्प’ कार्ड आहे, हे सर्वच जण जाणतात. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे कोहलीच्या खेळण्याबाबत साशंका असल्यामुळे भारतावरील दडपण मात्र वाढले आहे.

तीन कसोटी सामन्यांच्या थरारानंतर मालिकेत १-१ अशी उत्कंठा टिकून आहे. संघात आक्रमकता रुजवणारा संघनायक कोहली दुखापतीमुळे १०० टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. धरमशालाच्या सामन्यात कोहलीच्या नेतृत्वक्षमतेची नितांत आवश्यकता होती. मात्र सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या खेळण्याबाबतची शक्यता धूसर असल्याचे स्पष्ट केले. कोहली तिन्ही सामन्यांत फलंदाज म्हणून झगडतानाच आढळला. मात्र त्याच्या फलंदाजीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. म्हणूनच त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघात समाविष्ट होणाऱ्या मुंबईकर पदार्पणवीर श्रेयस अय्यरकडून मोठय़ा अपेक्षा असतील.

कोहलीने शुक्रवारी नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. मात्र खेळण्यासंदर्भातील निर्णय फक्त फिजिओ पॅट्रिक फरहार्ट घेऊ शकतील. या निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही मानसिक आघाडी मिळवू न देण्याचा भारताचा इरादा आहे. याच कारणास्तव खेळण्याबाबत साशंका असली तरी कोहलीने कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेला हजेरी लावली. कोहली खेळू न शकल्यास मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे नेतृत्वाची धुरा सांभाळेल.

‘‘तंदुरुस्ती चाचणीचा निर्णय अनुकूल ठरला, तर मला मैदानावर उतरता येईल. याबाबत जोखीम कितपत असेल, हे फिजिओच योग्य पद्धतीने सांगू शकतील,’’ असे कोहलीने सांगितले.

श्रेयस सकाळी धरमशाला येथे दाखल झाला. त्यामुळे उशिराने सराव सत्रात सामील झाला. त्याने नेटमध्ये फलंदाजी केली. प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कोहलीने त्याच्या फलंदाजीची बारकाईने पाहणी करून त्याच्याशी सल्लामसलत केली. वेग आणि उसळी हे वैशिष्टय़ जपणाऱ्या या मैदानावर आक्रमक फलंदाजी करणारा श्रेयस लीलया कट आणि पुलचे फटके खेळू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात अय्यरने द्विशतक झळकावले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करण्याचा अनुभव आणि आत्मविश्वास त्याच्या गाठीशी आहे. त्या सामन्यात मिचेल स्टार्क आणि जोश हॅझलवूड खेळले नव्हते.

या मालिकेत झालेल्या वादांमुळे मध्यंतरी दोन्ही संघांच्या क्रिकेट मंडळांना समेटाची भूमिका घ्यावी लागली होती. मात्र तरीही कसोटी क्रिकेटची रंगत मात्र प्रत्येक सामन्यात क्रिकेटरसिकांनी अनुभवली. रांचीमधील तिसरा कसोटी सामना अत्यंत कठीण स्थितीतून ऑस्ट्रेलियाने अनिर्णीत राखला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाने आपल्याकडे भारतीय वातावरणातसुद्धा सामना वाचवण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले. खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकाव धरण्याचे तंत्र पीटर हँड्सकोम्बकडे आहे.

भारताच्या फलंदाजीच्या आशा सलामीवीर लोकेश राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारावर प्रामुख्याने अवलंबून आहेत. मुरली विजयने अपेक्षांची पूर्तता करणारी खेळी साकारण्याची आवश्यकता आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेच्या नेतृत्वाची झलक फलंदाजीतसुद्धा दिसू शकेल. कोहलीची आक्रमकता जरी त्याच्यात नसली तरी महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेला रहाणे स्वत:च्या नेतृत्वाची एक उत्तम रणनीती जपणारा आहे.

धरमशालाची कसोटी अनिर्णीत राहिल्यास तो ऑस्ट्रेलियासाठी मनोधर्य उंचावणाऱ्या विजयाप्रमाणेच असेल, तर विजयाची चव ही अ‍ॅशेसमधील विजयासारखीच अत्युच्च दर्जाची असेल. ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा भारतीय भूमीवर दाखल झाला, तेव्हा त्यांच्याकडून माफक अपेक्षा करण्यात आल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाने अनपेक्षितपणे भारताला तोडीस तोड टक्कर दिली आहे. स्मिथची दोन शतके, नॅथन लिऑनची फिरकी, मॅट रेनशॉ आणि पीटर हँड्सकोम्बची चिवट फलंदाजी ही त्यांच्या यशातील ठळक वैशिष्टय़े. धरमशालाच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओ’कीफऐवजी वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डला संधी मिळू शकेल. रांचीत ओ’कीफला ७७ षटकांमध्ये एकही बळी मिळाला नव्हता.

बातम्या विकणाऱ्या प्रसारमाध्यमांना कोहलीच्या शुभेच्छा!

ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीला लक्ष्यस्थानी ठेवून ‘सर्पसम्राट’ आणि ‘क्रिकेटविश्वातील ट्रम्प’ अशा उपमा दिल्या आहेत. मात्र तरीही निर्णायक कसोटी सामन्याकडे शांत चित्ताने पाहताना कोहलीने त्या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांना बातम्या विकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मी नेहमीच योग्य वाटते तेच बोलतो, त्यामुळे नंतर मला त्याबाबत कधीच खंत वाटत नाही, असे कोहलीने या वेळी सांगितले. ‘‘योग्य गोष्टींशी मी नेहमीच ठाम असतो. मला जे योग्य वाटते, तेच बोलतो. त्यानंतर ते विधान मी बोललोच नाही, असे सांगायची आवश्यकता भासत नाही. बऱ्याच माणसांना एका व्यक्तीची बाधा झाली आहे, याचे मला आश्चर्य वाटते आहे. त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा. जर त्यांना आपली बातमी विकायची असेल, तर त्यासाठीही शुभेच्छा,’’ अशा शब्दांत कोहलीने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यम आणि अन्य मंडळींचा समाचार घेतला.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, अभिनव मुकुंद, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, जयंत यादव, मोहम्मद शमी
  • ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मॅट रेनशॉ, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), नॅथन लिऑन, जोश हॅझलवूड, स्टीव्ह ओ’कीफ, जॅक्सन बर्ड, मिचेल स्वीपसन, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅश्टॉन अगर, उस्मान ख्वाजा, पॅट कमिन्स.