भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २०१६ या वर्षात क्रिकेटच्या मैदानासोबतच इंटरनेट विश्वात देखील अव्वल कामगिरी केली आहे. इंटरनेटच्या महाजालात वर्षभरात सर्वाधिक सर्च झालेल्या हिंदी आणि इंग्रजी कीवर्ड्समध्ये विराट कोहली हे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील इंटरनेट वापराची परिभाषा बदलून टाकण्याच्या उद्देशाने मोफत सुविधा पुरविणाऱया ‘रिलायन्स जिओ’ हा कीवर्ड्स सर्वाधिक सर्च झालेल्या यादीत दुसऱया स्थानी असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्डने दिले आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ‘रिलायन्स जिओ’ या कीवर्डला मागील वर्षात तब्बल ११६ कोटी पेजव्ह्युज मिळाले आहेत.
‘रिलायन्स जिओ’ने ग्राहकांसाठी मोफत इंटरनेट आणि कॉल्सची सेवेची घोषणा केली होती. त्यानंतर ‘रिलायन्स जिओ’ने इंटरनेट विश्वात धमाका केला आहे. भारतीय नेटिझन्सची इंटरनेटवर शोध घेण्याच्या आवडीचा एकंदर अहवाल पाहता क्रीडा क्षेत्रात नेटिझन्सनी विराट कोहली बद्दलची सर्वाधिक माहिती सर्च केली, तर त्याखालोखाल धोनी इंटरनेटवर चर्चेत राहिला. विराट कोहली या कीवर्डला १०८ कोटी व्ह्युज मिळालेत, तर ‘रिलायन्स जिओ’ला ११६ कोटी पेजव्ह्युज मिळाले असले तरी एका व्यक्तीच्या सर्वाधिक सर्चमध्ये कोहलीच नंबर वन ठरला आहे. कोहलीसोबत बॉलीवूड विश्वात अभिनेता सलमान खान याच्याबद्दलची सर्वाधिक माहिती सर्च केली गेली. तर अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्राने बाजी मारली आहे. बॉलीवूडते हॉलीवूड असा प्रवास केलेल्या अभिनेत्रीबद्दल इंग्रजी कीवर्डने सर्वाधिक माहितीचा इंटरनेटवर शोध घेतला गेला तर हिंदी कीर्वडमध्ये अभिनेत्री करिना कपूर हा कीवर्ड सर्वाधिक सर्च झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकतेच फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहलीने धोनीला मागे टाकून अव्वल स्थान प्राप्त केले होते. कोहलीने फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या यादीत १३४.४४ कोटींच्या उत्पन्नासह पहिल्या, तर धोनी १२२ कोटींच्या कमाईसह दुसऱया स्थानावर होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 8:03 pm