वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयन बिशप यांनी विराट कोहली आणि बाबर आझम यांना खेळताना सचिन तेंडुलकरची आठवण येते असं म्हटलं आहे. झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज पॉमी एमबान्ग्वासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये गप्पा मारताना बिशप यांनी हे मत मांडलं आहे.

“ज्यावेळी मैदानात सरळ फटके खेळण्याची गोष्ट येते त्यावेळी विराट आणि बाबर आझममध्ये मला सचिनची खेळी दिसते. सचिन हा माझ्यामते सर्वोत्तम फलंदाज आहे. याचं कारण म्हणजे मी त्याला गोलंदाजी केली आहे, त्याच्याकडे सरळ फटके खेळण्याचं कौशल्य होतं. सध्याच्या घडीला ते कौशल्य मला विराट आणि बाबर आझम यांच्यात दिसतं.” बिशप एमबान्ग्वा यांच्याशी बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यात सोशल मीडियावर सातत्याने तुलना होत असते.

यावेळी बोलत असताना बिशप यांनी भारताच्या जसप्रीत बुमराहचंही कौतुक केलं. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी बुमराहने जी मेहनत घेतली आहे ती वाखणण्याजोगी असल्याचं बिशप म्हणाले. बाबर आझम सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून विराट कोहली आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे.