भारतीय क्रिकेट संघाने २०१९ वर्षातला आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. कटकच्या मैदानात भारताने वेस्ट इंडिजवर ४ गडी राखत मालिकेत २-१ ने बाजी मारली. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतीय संघाकडून २०१९ वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं. २०१९ ची विश्वचषक स्पर्धा रोहितने आपल्या धडाकेबाज शतकी खेळीने गाजवली.

२०१९ वर्षात आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

१) रोहित शर्मा – भारत – १४९० धावा

२) विराट कोहली – भारत – १३७७ धावा

३) शाई होप – वेस्ट इंडिज – १३४५ धावा

४) अ‍ॅरॉन फिंच – ऑस्ट्रेलिया – ११४१ धावा

५) बाबर आझम – पाकिस्तान – १०९२ धावा

मात्र २०१९ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (वन-डे, टी-२० आणि कसोटी) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने पहिलं स्थान पटकावलं आहे. केवळ ६ धावांनी रोहित दुसऱ्या स्थानावर फेकला गेला.

याव्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१९ साली सर्वाधिक अर्धशतकी खेळी करण्याच्या निकषातही विराटनेच बाजी मारली आहे. रोहित या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

मात्र २०१९ वर्षात सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार पटकावण्याच्या निकषात रोहित आणि विराटची बरोबरी झाली आहे.

अखेरच्या वन-डे सामन्यात निर्णयाक अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला सामनावीराचा तर रोहित शर्माला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. नवीन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. २०२० वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. २०१९ वर्षाची अखेर भारतीय संघाने मालिका विजयाने केली आहे, त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.