रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमातील निराशाजनक कामगिरीबद्दल बंगळुरुवासियांची आणि संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. विराट कोहलीने संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन संघाच्या चाहत्यांची आणि समर्थकांची माफी मागितली.

संघ पराभूत होत असतानाही संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे विराट कोहलीने आभार मानले. आयपीएलच्या दहाव्या मोसम्यात बंगळुरुच्या संघाला अवघ्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. बंगळुरुचा संघ आतापर्यंत १३ सामने खेळला असून त्यांची यंदाची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरुच्या संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. दुखापतींचा फटका बंगळुरुला बसल्याने संघाच्या फलंदाजीवर परिणाम झाला. त्यामुळे ख्रिस गेल, एबी डी’व्हिलीयर्स, विराट कोहली, शेन वॉटसन यांच्यासारखे एकापेक्षा एक फलंदाज असूनही बंगळुरुची फलंदाजी अनेकदा कोलमडली. आयपीएलमधील यंदाची निच्चांकी धावसंख्यादेखील बंगळुरुच्या नावावर आहे. गोलंदाजीतही बंगळुरुचा संघ फारशी कमाल करु शकली नाही. यंदाच्या आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू असलेला टायमल मिल्स हा वेगवान गोलंदाज बंगळुरुच्या ताफ्यात होता. मात्र त्यालादेखील छाप पाडता आली नाही.

यंदाच्या हंगामातील बंगळुरुचा शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध होणार आहे. १४ मे रोजी दिल्लीतील फिरोझ शहा कोटला मैदानावर बंगळुरुचा संघ दिल्लीच्या आव्हानाला सामोरा जाईल. दिल्लीने ११ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमातील दिल्लीचे आव्हानदेखील जवळजवळ संपुष्टात आले आहे.