सध्याच्या व्यावसायिक युगात आपले उत्पादन प्रकर्षाने ग्राहकांसमोर मांडण्यासाठी जाहिरातबाजीच्या वाढत्या मागणीबाबत वेगळे काही संगण्याची गरज नाही. त्यात जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱया चेहऱयालाही तितकेच महत्त्व असते. आपल्या कंपनीची ओळख आणि इतरांपेक्षा वेगळे स्टेटस निर्माण करण्यासाठी कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी लोकप्रिय चेहऱयांना पसंती देतात. त्यात जाहिरातदारांची क्रिकेटपटूंकडे जास्त ओढ असते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जसा क्रिकेटच्या मैदानात दमदार फॉर्मात आहे. त्याचप्रमाणे मैदानाबाहेर कोहलीची ‘ब्रॅण्डव्हॅल्यू’ देखील गगनाला भिडली आहे. गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. यादीत कोहली दुसऱया स्थानावर असून बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान अजूनही अव्वल स्थानावर आहे.

 

कोहलीने गेल्या वर्षभरात केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डींग कोहलीने करावे यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत, असे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. चार मालिकांमध्ये सलग चार द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. सध्याच्या घडीला कोहली २० अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.