इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने चौथे स्थाप प्राप्त केले आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या कोहली अग्रस्थानावर आहे, तर एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र कसोटी क्रमवारीत दहाव्या स्थानापेक्षा अधिक उंची त्याने कधीच गाठली नव्हती.

विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने अनुक्रमे १६७ आणि ८१ धावा केल्या. ही कसोटी भारताने २४६ धावांनी जिंकली. त्यामुळेच कोहलीला चौथे स्थान गाठता आले. याशिवाय प्रथमच त्याने ८०० गुणांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा तो ११वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

कोहलीने चेंडू कुरतडला; इंग्लंडच्या सायंदैनिकाचा आरोप

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळण्याचे प्रकरण ताजे असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर अशाच स्वरूपाचा आरोप इंग्लंडमधील एका सायंदैनिकाने केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  राजकोट कसोटीदरम्यान कोहलीने तोंडातील मिंटद्वारे चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप दैनिकाने केला आहे. मात्र यासंदर्भात इंग्लंड संघाने कोणत्याही स्वरूपाची तक्रार दाखल केलेली नाही, तसेच यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चेंडूच्या स्थितीसंदर्भात प्रतिस्पर्धी कर्णधार किंवा खेळाडू यांच्याविरोधात तक्रार असेल तर आयसीसीच्या नियमानुसार सामना संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत दाखल करणे आवश्यक असते. राजकोट कसोटी १३ नोव्हेंबरला संपली. त्यानंतरच्या विश्रांती कालावधीनंतर झालेली विशाखापट्टणम् कसोटीही झाली. इंग्लंड संघाला कोहलीबाबत कोणतीही तक्रार नसल्याने याप्रश्नी पडदा पडला आहे.