नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याला कसोटी सामन्यांचे महत्त्व ठाऊक आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने कोहलीवर स्तुतीसुमने उधळली.

कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारताने तब्बल तीन वर्षे क्रमवारीतील अग्रस्थान टिकवून धरले होते. ‘‘विराट कोहली कसोटी सामन्यांचे महत्त्व जाणून आहे. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ही फार आनंदाची बाब आहे. जेव्हा एखाद्या संघाचा कर्णधार क्रिकेटच्या पारंपरिक प्रकाराचे महत्त्व जाणतो, त्या वेळी आपसुकच त्याची आणि संघाचीही त्या प्रकारातील कामगिरी सर्वोतम असते,’’ असे द्रविड म्हणाला. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरशी साधलेल्या ऑनलाइन संवादादरम्यान द्रविडने कोहलीविषयीचे मत मांडले.

‘‘कोणताही क्रिकेटपटू त्याच्या कसोटी सामन्यांतील कामगिरीवरून अधिक ओळखला जातो. आमचा जेव्हाही संवाद होतो, त्या वेळी कोहली कसोटीचा आवर्जून उल्लेख करतो. कसोटी लढतींमधील त्याची गेल्या काही वर्षांतील कामगिरी कौतुकास्पद असून युवा खेळाडूंनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे,’’ असेही द्रविडने सांगितले.

कोहलीसोबत खेळल्याने सुदैवी -विल्यम्सन

मुंबई : भारताचा अव्वल क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत अनेक वर्षे क्रिकेट खेळल्याने स्वत:ला सुदैवी मानतो, असे कौतुकोद्गार न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने काढले आहेत. कोहली आणि विल्यम्सन हे २००८पासून एकमेकांसोबत खेळले आहेत. ‘‘आम्हाला एकमेकांविरुद्ध खेळता आले हे मी सुदैव मानतो. कोहलीला लहान वयापासूनच पाहत आलो आहे. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीतील यशाचा चढता आलेखही पाहिला आहे,’’ असे विल्यमसनने सांगितले.