भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कायमच रोमांचक असतो. या दोन देशांतील क्रिकेटपटूंची अनेकदा तुलना केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझम या दोघांच्या खेळाची आणि फलंदाजीची बहुतांश वेळा तुलना करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी याने ‘जर तुम्हाला विराट कोहली उत्तम फलंदाज वाटत असेल, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की बघा’, असं मत व्यक्त केलं होतं. तर ‘विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे. बाबर आझम त्याच्या आसपासही नाही’, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता खुद्द पाकचा नवा कर्णधार बाबर आझमनेच एक वक्तव्य केलं आहे.

“तुम्हाला जर माझी कोणाशी तुलना करायचीच असेल, तर विराटपेक्षाही तुम्ही माझी तुलना पाकिस्तानच्या महान खेळाडूंशी करा. आपल्याकडे जावेद मियांदाद, युनिस खान, इंझमाम उल हक यांसारखे खूप महान खेळाडू होऊन गेले. त्या महान खेळाडूंशी जर माझी तुलना करण्यात आली, तर मला त्याचा जास्त आनंद होईल आणि माझ्या यशाचा मला गौरव झाल्यासारखं वाटेल”, असे मत पाक फलंदाज बाबर आझम याने टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना व्यक्त केले.

विराट-बाबर तुलनेवर या आधी कोण काय म्हणाले?

विराट कोहलीची अनेकदा पाकिस्तानचा बाबर आझम याच्याशी तुलना केली जाते. त्याच्याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ म्हणाला, “बाबर हा युवा खेळाडू आहे. त्याची खूप जण विराटशी तुलना करतात. पण सध्या तरी अशी तुलना करणं योग्य नाही. विराट हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. तो अनन्यसाधारण क्रिकेटपटू आहे. विराटने बाबरपेक्षा खूप जास्त सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांची तुलना शक्य नाही.”

एका कार्यक्रमात बोलताना टॉम मूडी म्हणाला, “गेल्या वर्षभरात बाबर आझमने अशी दमदार कामगिरी केली आहे की त्यातून तो नक्कीच खास स्थानावर पोहोचू शकेल. आपण नेहमी फलंदाजीत विराट कोहली कशाप्रकारे सर्वोत्तम आहे याची चर्चा करतो. जर तुम्हाला विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की पाहा. पुढच्या पाच ते दहा वर्षात बाबर आझम नक्कीच दशकातील पहिल्या पाच सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असेल.”

इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद म्हणाला, “दोघांमध्ये सर्वोत्तम कोण हे सांगणं खरंच खूप कठीण आहे. जर तुम्ही सध्याच्या फॉर्मचा आणि आकडेवारीचा विचार केलात, तर अशा वेळी मी बाबर आझमला निवडेन. मी इथे सध्याच्या फॉर्मबद्दल बोलतोय हे साऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. आताच्या घडीला बाबर आझमचा फॉर्म हा खूपच झकास आहे. म्हणून मी त्याची निवड करतोय. पण क्रिकेटपटू म्हणून बोलायचे झाले तर हे दोघेही अतिशय प्रतिभावंत खेळाडू आहेत.