न्यूझीलंडविरुद्ध २११ धावांची खेळी करत विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. कसोटीत दोन वेळा द्विशतक ठोकणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार असून सुनील गावस्कर, महेद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, नवाब पतौडी यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांनाही या विक्रमाला गवसणी घालता आलेली नाही. याशिवाय एकाच वर्षात दोनदा द्विशतक ठोकण्याचा सचिनच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये दुसरा कसोटी सामना आहे. या कसोटीतील दुस-या दिवशी कर्णधार विराट कोहलीने २११ धावांची शानदार खेळी करत भारताला सुस्थितीत नेले. कोहलीने ३६६ चेडूंमध्ये २११ धावा केल्या असून यामध्ये २० चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने अजिंक्य रहाणेसोबत चौथ्या विकेटसाठी तब्बल ३६५ धावांची भागीदारी करत भारताला पाचशेचा टप्पा ओलांडून दिला. पहिल्या दोन सामन्यात कोहली अपयशी ठरल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. मात्र तिस-या कसोटीत कोहलीने खणखणीत द्विशतक ठोकून भारतीय डावाला आकार दिला.

एकदिवसीय आणि कसोटीत कोहलीची चमकदार कामगिरी सुरु होती. मात्र भारतात झालेल्या कसोटी सामन्यांमधील  गेल्या १७ डावांमध्ये कोहलीला शतक ठोकता आले नव्हते. इंदूरमध्ये कोहलीने द्विशतक ठोकून टिकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आघाडीचे तिन्ही फलंदाज शंभर धावांच्या आतच माघारी परतले होते. पण कोहलीने चौथ्या स्थानी येऊन संयमी खेळी करत समर्थपणे संघाची धुरा वाहिली. कोहलीने याच वर्षी  वेस्ट इंडिजविरुद्ध कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले होते.

अजिंक्य रहाणेचे द्विशतक हुकले

कर्णधार कोहलीच्या द्विशतकानंतर अजिंक्य रहाणेही द्विशतक ठोकतो का याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण अजिंक्य रहाणेचे १२ धावांनी द्विशतक हुकले. रहाणेने १८८ धावांची खेळी केली असून यामध्ये १८ षटकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.