कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली.

Video : राहुलचा ‘मिनी-हेलिकॉप्टर’ शॉट पाहिलात का?

विराटने या सामन्यात दमदार खेळी केली. त्याने ८१ चेंडूत ८५ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ९ चौकार लगावले. मधल्या फळीतील खेळाडू झटपट बाद झाल्यावर विराटने रविंद्र जाडेजाच्या साथीने आपली खेळी सजवली आणि भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यातील त्याच्या खेळीमुळे यंदाच्या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याने यंदाच्या कॅलेंडर वर्षात तब्बल २४५५ धावा केल्या. त्यासह विराटने सलग चौथ्या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.

विराट २०१६ साली २५९५ धावांसह अव्वल स्थानी होता. २०१७ सालीदेखील विराटने वर्षभरात २८१८ आंतरराष्ट्रीय धावा ठोकल्या आणि यादीतील अव्वल स्थान कायम राखले. त्यानंतर २०१८ साली तो २७३५ धावा करत अव्वल स्थानी विराजमान झाला. तर २०१९ या वर्षात विराटने २४५५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रंगलेल्या शर्यतीत अखेर विराट सरस ठरला. रोहित २०१९ या वर्षात २४४२ आंतरराष्ट्रीय धावा करत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम (२०८२) तिसरा तर न्यूझीलंडचा रॉस टेलर (१८२०) चौथ्या स्थानी आहे.

निर्णायक सामन्यात विराट ठरला सामनावीर

प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतले. पण विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि ८५ धावांची खेळी केली.