इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने दोन्ही डावात केलेली झुंजार खेळी इतर फलंदाजांच्या हाराकारीमुळे व्यर्थ गेली असली तरी विराट कोहलीच्या स्वतःच्या क्रमवारीसाठी ही कसोटी फायद्याची ठरली. पहिल्या डावात झळकावलेलं कारकिर्दीतील 22 वं शतक(149) आणि दुसऱ्या डावातील अर्धशतकाच्या(51) जोरावर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठलं आहे.

बॉल टॅम्परिंगप्रकरणामुळे मैदानाबाहेर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कोहलीने मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. कोहलीने आयसीसी क्रमवारीत 934 गुण पटकावत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर स्टिव्ह स्मिथचे 929 गुण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट असून त्याचे 865 गुण आहेत.

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानाला गवसणी घालणारा कोहली हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. कोहलीव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर यांनाच ही किमया साधता आली आहे.


इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत विजयासाठी १९४ धावांची आवश्यकता असताना भारताला १६२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली आणि या सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवून इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.