क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम फलंदाज कोण, विराट कोहली की स्टिव्ह स्मिथ?? ही चर्चा गेली अनेक वर्ष प्रत्येक क्रिकेट प्रेमी ऐकत आलेला आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व क्रीडापटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार इयान चॅपल यांच्या मते भारतीय कर्णधार विराट कोहली हाच तिन्ही प्रकारात सर्वोत्तम फलंदाज आहे. ते Sony Ten वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

“भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगले फलंदाज तयार केले आहेत. अनेकदा मला स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम कोण असा प्रश्न विचारण्यात येतो. पण ज्यावेळी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचा विचार करायचा असतो, त्यावेळी विराट कोहलीच हेच नाव मी कायम घेतो. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० ची आहे, त्यामुळे माझ्यासाठी सध्याच्या घडीला विराट कोहली हाच सर्वोत्तम फलंदाज आहे.” चॅपल यांनी आपलं मत मांडलं.

सध्या करोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात येत आहे. यानंतर टीम इंडियाचा प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौरा आहे. ज्यात दोन्ही संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. ही मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. मात्र या स्पर्धेआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात स्वतःला दोन आठवडे क्वारंटाइन करेल अस मतही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी मांडलं आहे. “कसोटी मालिका खेळायची असेल तर स्वतःला क्वारंटाइन करण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु करायचं असेल तर हे करावंच लागेल. दोन आठवड्यांचा कालावधी हा कोणत्याही क्रीडापटूसाठी योग्य आहे. फक्त त्याआधी दोन्ही देशांमधलं सरकार नेमकं काय नियम आखून देतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” धुमाळ The Sydney Morning Herald वृत्तपत्राशी बोलत होते.