नामदेव कुंभार

इंग्लंडविरोधात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताचा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावे लागले आहे. विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यानंतर फलंदाजांनी नांगी टाकली. पुजारा आणि रहाणेच्या दोन खेळींचा अपवाद वगळता त्यांनीही हवी तशी फलंदाजी केली नाही. फलंदाजीतल्या अपयशामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला असे म्हटल्यास वावगे वाटायला नको.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला इंग्लंडमध्ये खेळता येणार नाही असे मत टिकाकारांनी व्यक्त केले होते. उसळत्या खेळपट्टीवर अँडरसनची गोलंदाजी करताना विराट चाचपडतो असे क्रीडा समिक्षकांसह माजी खेळाडूंनी तारस्वरात सांगितले होते. त्याला कारणही तसेच होते. भारताने २०१४मध्ये केलेल्या इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. पण चुकांमधून धडे घेत मोठे व्हा, असा सल्ला देणे सोपे असले, तरी चुका सुधारण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. मोहावर पाणी सोडत कठोर परीश्रम घ्यावे लागतात. विराट कोहलीने तेच केले. या पाच कसोटीतील दहा डावांत खोऱ्याने धावा काढत प्रत्येक सामन्यांमध्ये भारताचे आव्हान त्यानं जिंवत ठेवले. पण इतर फलंदाजाकडून हवी तशी साथ न मिळाल्यामुळे भारत कसोटी मालिका वाचवू शकला नाही.

२०१४ च्या दौऱ्यात विराट कोहलीला पाच कसोटीत दहा डावांत १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० अशाच धावा करता आल्या. विराट कोहलीची १३.३० अशी सरासरी होती. विराट कोहलीच्या करीयरमधील विक्रमांकडे बघता यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र विराट कोहलीला हे अपयश पहावे लागले. विराट कोहलीच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत होती. विराट कोहली फक्त आशियातील खेळपट्टीवर धावा काढतो असा आरोप त्याच्यावर होत होता. या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये भरपूर धावा काढून टिकाकारांची तोंडं बंद करायची संधी विराटनं मिळाली जिचं त्यानं सोनं केलं, त्यानं खोऱ्यानं धावा काढल्या आणि आपला दर्जा सिद्ध केला.

या मालिकेत पाच कसोटीतील दहा डावांत विराट कोहलीने दोन शतकांसह ५९३ धावा काढल्या आहेत. २०१४ च्या दौऱ्यांमध्ये अँडरसनने विराट कोहलीला पाच ते सात वेळा बाद केले होते. विराट कोहलीने स्वत:वर मेहनत घेतली. २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात दहा डावांत अँडरसनच्या गोलंदाजीवर विराट कोहली एकदाही बाद झाला नाही. विराट कोहली फक्त आक्रमकता दाखवत नाही तर तो खेळावर मेहनत घेताना दिसतो. दुर्देवाने विदेशात त्याला अन्य फलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही हे वास्तव आहे. भारतीय संघाला एकट्या विराट कोहलीवर अवलंबून राहून चालणार नाही. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये विश्वचषक होत आहे. सांघिक कामगिरी केली तरच आपल्याला विश्वचषकावर नाव कोरता येईल. सर्वच फलंदाजांकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा असल्याचे सांगत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सांघिक कामगिरीचे महत्त्व अधोरेखीत केले आहे.