विदर्भाच्या संघाला सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वासिम जाफने, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं जाफरने म्हटलंय. शेष भारताविरुद्ध सुरु असलेल्या इराणी करंडकाच्या सामन्यादरम्यान जाफर एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“विराट सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. प्रत्येक सामन्यागणिक विराटकडून आपल्या अपेक्षा उंचावतच चालल्या आहेत. ज्या पद्धतीने तो स्वतःच्या फिटनेसची काळजी घेतो, त्याच्या फलंदाजीची शैली, मैदानातील त्याचं वावरणं यामुळे प्रत्येक तरुण खेळाडूचा रोल मॉडेल बनला आहे. प्रत्येक सामन्यात विराट एका नवीन विक्रमाला गवसणी घालतो आहे, सध्याच्या घडीला विराटची बरोबरी करेल असा एकही खेळाडू दिसत नाहीये”, जाफर विराटचं कौतुक करत होता.

2018 साली विराटने आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. यापुढे भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सामना करायचा आहे. 24 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात 2 टी-20 आणि 5 वन-डे सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – …तर विराट कोहलीने माझीही धुलाई केली असती !