विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विराट कोहलीने कर्णधार म्हणून आखलेल्या रणनितीचं अनेक माजी खेळाडूंनी कौतुक केलं आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनीही विराटचं कौतुक केलं असून, आगामी काळात विराट अशीच मेहनत करत राहिला तर तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकते असं वक्तव्य केलं आहे.

“संघाचा कर्णधार या नात्याने माझ्या मनात विराटबद्दल अजुनही काही शंका आहेत. मात्र या मालिकेत विराटने आपल्या चुकांमधून योग्य धडा घेतलाय, आणि आपण सर्व तो पाहू शकतोय. जर तो अशीच मेहनत करत राहिला तर खेळाडूंकडून मेहनत करुन घेण्याच्या बाबतीत आणि संघाला अधिकाधिक चांगले निकाल मिळवून देण्याच्या बाबतीत तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो.” Sony Sports वाहिनीवर बोलत असताना गावसकरांनी विराटचं कौतुक केलं.

पहिल्या डावात मार्नस लबुसचेंजला बाद करण्यासाठी रचलेला सापळा, 300 धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळल्यानंतर कांगारुंवर लादलेला फॉलोऑन या सर्व गोष्टी विराट एक कर्णधार म्हणून प्रगल्भ होत असल्याचं दाखवत आहेत. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.