भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी वन डे सामन्यांमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला असून हा टप्पा वेगाने ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही विराटने मोडला आहे. विराटने फक्त २०५ डावांमध्ये हा टप्पा गाठण्याची किमया साधली आहे. तर सचिनने २२९ डावांमध्ये दहा हजार धावा केल्या होत्या. यानंतर विराट आणि सचिन तेंडुलकरची तुलना होत असून विराट सचिनला मागे टाकणार का यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांच्या कामगिरीचा हा लेखाजोखा…

वन – डेत धावांचा पाठलाग करताना
विराट कोहली धावांचा पाठलाग करताना दबावाखालीदेखील सर्वोत्तम खेळी करतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या बाबतची आकडेवारीही हेच सांगते. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना ११६ डावांमध्ये ६८. ५४ च्या सरारीने ६, ०३२ धावा चोपल्या आहेत. यात २२ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने धावांचा पाठलाग करताना २३२ डावांमध्ये ४२.३३ च्या सरासरीने ८, ७२० धावा केल्या आहेत. यात १७ शतकांचा समावेश आहे.

कसोटीत चौथ्या डावातील कामगिरी
कसोटी सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करतानाही विराट धावांचा पाऊस पाडताना दिसतो. सचिन तेंडुलकरने ६० डावांमध्ये ३६. ९३ च्या सरासरीने १, ६२५ धावा केल्या असून यात तीन शतकांचा समावेश आहे. तर विराटने २२ डावांमध्ये ५१. ७० च्या सरासरीने ८७९ धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. कसोटीत चौथ्या- पाचव्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी होते. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे हे काहीसे आव्हानात्मकच असते.

तिसऱ्या डावात फलंदाजी करताना
कसोटीत तिसऱ्या डावात फलंदाजी करताना सचिनची कामगिरी विराट पेक्षा उजवी ठरते. सचिनन ७२ डावांमध्ये ४६. ८१ च्या सरासरीने २, ९९६ धावा केल्या आहेत. यात १० शतकांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने ३१ डावांमध्ये ३७. ७९ च्या सरासरीने १, ०९६ धावा केल्या आहेत. यात ३ शतकांचा समावेश आहे.

कर्णधारपदी असताना…
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २५ कसोटी सामन्यांपैकी फक्त ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर ९ सामन्यात भारताचा पराभव झाला आणि १२ सामने अनिर्णित राहिले. यात विजयाचे प्रमाण १६ टक्के होते. तर वन डे सामन्यात सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७३पैकी २३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. ४३ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. यात विजयाचे प्रमाण ३५. ०७ टक्के इतके आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४२ पैकी २४ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर ९ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. ९ सामने अनिर्णित राहिले. यात विजयाचे प्रमाण ५७. १४ टक्के इतके आहे. वन डे विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ५३ पैकी ४० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर १२ सामन्यात भारताचा पराभव झाला. यात विजयाचे प्रमाण ७६. ९२ टक्के होते.

‘SENA’मधील कामगिरी
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या चार देशांमध्ये भारतीय फलंदाजाची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. या देशातील हवामान, उसळती खेळपट्टी अशा परिस्थितीत फलंदाजांचा कस लागतो. या चार देशांमध्ये कसोटीत सचिनने ११४ डावांमध्ये ५१. ३० च्या सरासरीने ५, ३८७ धावा केल्या आहेत. यात १७ शतकांचा समावेश आहे. तर विराटने ५० कसोटीत ५०. ८३ च्या सरासरीने २, ४९१ धावा केल्या आहेत. यात १० शतकांचा समावेश आहे. त्यामुळे या चार देशांमध्ये कसोटीत सचिन विराटपेक्षा वरचढ ठरतो.

वन डे सामन्यांमध्ये विराटची कामगिरी उजवी ठरते. वन डेत विराटने ६७ डावांमध्ये ६०. ०७ च्या सरासरीने ३, १२४ धावा केल्या असून यात ९ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने १३२ डावांमध्ये ३८.२२ च्या सरासरीने ४, ८१६ धावा केल्या आहेत. यात नऊ शतकांचा समावेश आहे.

भारतातील कामगिरी
घरच्या मैदानातही विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा पुढे आहे. भारतात खेळताना कसोटी सामन्यांमध्ये विराटने ५४ डावांमध्ये ६४. ६८ च्या सरासरीने ३, १०५ धावा केल्या असून यात ११ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने कसोटीत १५३ डावांमध्ये ५२. ६७ च्या सरासरीने ७, २१६ धावा केल्या आहेत. यात २२ शतकांचा समावेश आहे.

वन डेमध्ये विराटने ७७ डावांमध्ये ५९. २५ च्या सरासरीने ३, ९७० धावा केल्या आहेत. यात १५ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने १६० डावांमध्ये ४८.११ च्या सरासरीने ६, ९७६ धावा केल्या आहेत. यात २० शतकांचा समावेश आहे.