महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण खेळाडूंना संघात जागा देऊन त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्याचं काम धोनीने आजवर केलं आहे. मात्र आपली कामगिरी ढासळल्यानंतर धोनीने आधी कसोटी आणि त्यानंतर वन-डे संघाचं नेतृत्व सोडून दिलं. कसोटी क्रिकेटमधून धोनीने संन्यासही घेतला. यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा ही युवा कर्णधार विराट कोहलीच्या हातात आली. गेल्या काही महिन्यांमध्ये कोहलीची मैदानातली कामगिरी पाहून अनेक जणांना त्याची तुलना धोनीसोबत करण्याचा मोह झाला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने कोहलीची तुलना धोनीसोबत होणं शक्यच नसल्याचं म्हणलं आहे.

आपल्या काळात झुंझार क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन्टी र्होड्सने विराटची तुलना धोनीसोबत होऊच शकत नसल्याचं म्हणलं आहे. “महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर हे खेळाडू त्यांच्या ठिकाणी आहेत, त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. २००८ पासून जॉन्टी हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. रोहीत शर्माची कर्णधार म्हणून शैली थोडी वेगळी आहे. तो कोहलीइतका मैदानात आक्रमक खेळत नाही, मात्र कठीण प्रसंग हाताळण्याची रोहीतला चांगलं जमतं”, असंही जॉन्टीने म्हणलं आहे.

भारताच्या सर्व खेळाडूंनी माजी खेळाडूंसोबत तुलना करुन घेण्याच्या मोहात पडू नये. विराट कोहली असो किंवा रोहीत शर्मा…त्यांनी मैदानात आपाल खेळ खेळला पाहिजे. रोहीत शर्मा दुसरा सचिन तेंडुलकर होऊ शकणार नाही किंवा विराट कोहली दुसरा महेंद्रसिंह धोनी होऊ शकणार नाही. सध्या कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय, मात्र यदा-कदाचीत संघाला अपयशाचा सामना करावा लागला, तर कोहली कर्णधार म्हणून परिस्थिती कशी हाताळतो हे पाहणं महत्वाचं असेल, असंही जॉन्टी र्होड्सने म्हणलंय.