परदेश दौरा हा फक्त पर्यटनासाठी असतो का, हा प्रश्न आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडलेला असावा. दक्षिण आफ्रिका दौरा असो किंवा त्यानंतरचा न्यूझीलंडचा दौरा भारतीय संघाची पाटी कोरी ती कोरीच राहीली. मोठय़ा गुर्मीत भारतीय संघ ‘टूर’ निघाली सारखे दौऱ्यावर निघाले पण पर्यटनाशिवाय त्यांना काहीच करता आले नाही आणि पदरी पडले ते मानहानीकारक पराभव. भारताने दुसरी कसोटी अनिर्णित राखली, हे एवढेच यश न्यूजीलंडच्या दौऱ्यात भारताच्या पदरी पडले असले तरी यजमानांनी ही मालिका १-० अशी जिंकली. कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमच्या ऐतिहासिक त्रिशतकाने न्यूझीलंडचा पराभव टाळलाच, पण भारताला विजयापासून वेशीच्या बाहेर पाठवत सामना अनिर्णित सोडवला. ब्रेन्डनचे त्रिशतक आणि बी जे वॉटलिंग व जिमी निशाम यांच्या शतकाच्या जोरावर न्यझीलंडने दुसरा डाव ६८० धावांवर घोषित केला. त्यांनी भारतापुढे अशक्यप्राय असे दोन सत्रांमध्ये ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले. विराट कोहलीने शतक झळकावले खरे, पण ते निर्थक असेल होते. दुसऱ्या डावात भारताने ५२ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १६६ धावा फटकावल्या, त्यावेळी कोणताही संघ सामना जिंकू शकत नसल्याने दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णित राखण्याचे ठरवले. भारताने दुसऱ्या डावातील पडझडीनंतर विराट कोहलीने शतक झळकावत सामना वाचवला असला तरी मालिका गमावण्याचे शल्य त्यांना सोसावेच लागले.
पहिला सामना जिंकल्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणे भाग होते, पण निष्प्रभ गोलंदाजीने त्यांचा घात केला. नीशामने पाचव्या दिवसाची सुरुवात दमदार केली. सामन्याच्या १९९ व्या षटकात २३ वर्षीय नीशामने दुहेरी धाव घेत पदार्पणात शतक झळकावण्याची किमया साधली. त्यानंतरच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर झहीर खानचा चेंडूने ‘थर्ड मॅन’ला सीमारेषा गाठली आणि साऱ्या स्टेडियमध्ये एकच जल्लोष सुरु झाला, उर अभिमानाने भरून आला होता, पॅव्हेलियनमधील आनंद आसंडून वाहत होता, त्याला कारण होते ते मॅक्क्युलमच्या त्रिशतकाचे. न्यूझीलंडकडून त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला, तर दुसऱ्या डावात त्रिशतक झळकावणारा सर डॉन ब्रॅडमन आणि मायकेल क्लार्क यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.

ही खेळी आयुष्यभराचा ठेवा
दुसऱ्या डावात ५ बाद ९४ अशा परिस्थितीत मी खेळायला उतरलो. कसोटी वाचवण्यासाठी तसेच मालिकाजिंकण्यासाठी आमचा संघर्ष सुरू होता. काही महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या झाल्या. प्रदीर्घ काळ फलंदाजी करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. हे शिवधनुष्य पेलण्यात आम्ही यशस्वी ठरलो. मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित चाहत्यांना पाहताच मला या खेळीचे महत्त्व जाणवले. आपल्या खेळीमुळे चाहत्यांना किती निस्सीम आनंद मिळू शकतो याची कल्पना आली. खेळाडूंनी विक्रम मोडण्याला किती अपार महत्त्व असते याची कल्पना आली. त्रिशतक झळकावल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट अविरत सुरूच होता. हे त्रिशतक न्यूझीलंड क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. ही खेळी आयुष्यभराचा ठेवा आहे. गेल्या २४ तासांपर्यंत या खेळीचे गांभीर्य मला लक्षात आले नव्हते. मार्टिन क्रोची २९९ धावांची खेळी मी पाहिली होती. न्यूझीलंडवासीयांसाठी ही खेळी किती महत्त्वाची आहे याची प्रचीती आली. स्टीफन फ्लेमिंगशी माझे काल रात्री बोलणे झाले. क्रो, फ्लेमिंग यांच्याइतकी माझी क्षमता नाही आणि आता माझ्या नावावर त्रिशतक आहे, त्यामुळे मला ओशाळल्यासारखे वाटत आहे. ही खेळी साकारताना ब्रॅडले वॉटलिंग आणि जेम्स निशाम यांनी दिलेली साथ अतिशय महत्त्वाची आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलम

नीशमचे शतक आणि मॅक्क्युलमचे त्रिशतक झाल्यावर न्यूझीलंडला खरे तर डाव घोषित करायला हवा होता. पण त्यांनी भारतीयांना जास्त वेळ न देण्याचे ठरवत संयमी रणनिती आखली होती. त्रिशतक झळकावल्यावर दुसऱ्याच चेंडूवर मॅक्क्युलम बाद झाला. त्यानंतरही न्यूझीलंडने खेळ सुरुच ठेवत अखेर ६८० धावांवर डोव घोषित केला. मॅक्क्युलमने तब्बल ३२ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ३०२ धावांची अद्वितीय खेळी साकारली. तर नीशामने २० चौकारांच्या जोरावर नाबाद १३७ धावांची खेळी साकारली. झहीर खानने या डावात पाच बळी मिळवले, पण त्यासाठी त्याला १७० धावा मोजायला लागल्या.
भारतापुढे विजयासाठी ४३५ धावांचे अशक्यप्राय आव्हान असल्याने त्यांनीही संयमी खेळ करायला हवा होता. पण भारताने दोन्ही सलामीवीर अवघ्या दहा धावांवर गमावले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने शतक झळकावत भारताचा डाव सावरला.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : १९२.
भारत (पहिला डाव) : ४३८.
न्यूझीलंड (दुसरा डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. खान १, हमिश रुदरफोर्ड झे. धोनी गो. झहीर ३५, केन विल्यमसन झे. धोनी गो. झहीर ७, टॉम लॅथम झे. धोनी गो. शमी २९, ब्रेन्डम मॅक्क्युलम झे. धोनी गो. झहीर ३०२, कोरे अँडरसन झे. व गो. जडेजा. बी जे वॉटलिंग पायचीत गो. शमी १२४, जिमी नीशाम नाबाद १३७, टीम साऊदी झे. पुजारा गो. झहीर ११, नील व्ॉगनर नाबाद २, अवांतर (वाइज ९, लेग बाइज १२, वाइड २, नो बॉल ७) ३०, एकूण २१० षटकांत ८ बाद ६८० (डाव घोषित).
बाद क्रम : १-१, २-२७, ३-५२, ४-८७, ५-९४, ६-४४६, ७-६३५, ८-६३९.
गोलंदाजी : इशांत शर्मा ४५-४-१६४-०, झहीर खान ५१-१३, १५०-५, मोहम्मद शमी ४३-६-१४९-२, रवींद्र जडेजा ५२-११-११५-१, रोहित शर्मा ११-०-४०-०, विराट कोहली ६-१-१३-०, महेंद्रसिंग धोनी १-०-५-०, शिखर धवन १-०-३-०.
भारत (दुसरा डाव): मुरली विजय झे. अँडरसन गो. साऊदी ७, शिखर धवन पायचीत गो. बोल्ट २, चेतेश्वर पुजारा झे. वॉटलिंग गो. साऊदी १७, विराट कोहली नाबाद १०५, रोहित शर्मा नाबाद ३१, अवांतर (वाइड २, नो बॉल २) ४, एकूण ५२ षटकांत ३ बाद १६६.
बाद क्रम : १-१०, २-१०, ३-५४.
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट १६-५-४७-१, टीम साऊदी १६-३-५०-२, नील व्ॉगनर ११-३-३८-०, जिमी नीशाम ५-०-२५-०, कोरे अँडरसन ४-१-६-०.