दक्षिण आफ्रिका दौरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सर्वात लक्षवेधी ठरणार आहे तो एबी डी’व्हिलियर्स. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि डी’व्हिलियर्स हे चांगले मित्र आहे. कारण आयपीएलमध्ये ते एकाच संघातून खेळतात. कोहलीला डी’व्हिलियर्सबद्दल आदर आहे. पण जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी म्हणून समोर असेल तर तो सर्वप्रथम संघाच्या रडारवर असेल, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

डी’व्हिलियर्सला जानेवारी २०१६ साली दुखापत झाली होती. त्यानंतर गेल्या २३ महिन्यांमध्ये तो फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. ‘बॉक्सिंग डे’ला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यामध्ये डी’व्हिलियर्स तब्बल दोन वर्षांनी खेळला होता. या सामन्यात संघाचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते.

‘‘डी’व्हिलियर्स हा माझा चांगला मित्र आहे. तो एक चांगला फलंदाज आणि माणूसही आहे. त्याचा मी नेहमीच आदर करतो. पण मी भारताकडून खेळताना जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी असतो तेव्हा त्याला झटपट कसे बाद करता येईल, याचाच मी विचार करत असतो,’’ असे कोहलीने सांगितले.

संघाला जिंकण्याची भूक अधिक

जर तुम्ही एक संघ म्हणून मैदानात उतरता तेव्हा प्रत्येक खेळाडूला विजयात हातभार लावायचा असतो. आपल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची भावना असते. काही वेळा एखादा खेळाडू अशी काही अद्वितीय कामगिरी करतो की, त्याच्या एकटय़ाच्या जोरावरही संघ जिंकू शकतो, पण जेव्हा २-३ खेळाडू विजयात मोलाचे योगदान देतात तेदेखील महत्त्वाचे असते. सध्याच्या घडीला भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला जिंकण्याची भूक अधिक आहे. प्रत्येक जण संधीच्या शोधात असून संघासाठी ही चांगली गोष्ट आहे, असे कोहली म्हणाला.

..ते बोलणे चुकीचे ठरेल

  • सध्याच्या घडीला डी’व्हिलियर्सबद्दल बोलणे चुकीचे ठरेल. कारण दुखापतीमुळे तो जवळपास दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर आता फक्त एकच कसोटी सामना तो खेळला आहे. तो एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. पण त्याच्या फॉर्मबद्दल बोलणे चुकीचे ठरेल, असे कोहली म्हणाला.
  • ‘भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच आम्हाला दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाही, हे आम्ही जाणून आहोत. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. त्यानुसार आम्ही सराव करत आहोत. यापूर्वीही संघातील काही खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे आमच्यासाठी या खेळपट्टय़ा आणि वातावरण नवीन नाही,’ असे कोहलीने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आम्हाला एकमेव सराव सामना मिळणार होता, पण दक्षिण आफ्रिकेच्या मंडळाने तो एकमेव क्रिकेट सामनाही रद्द केला. पण सराव सामना रद्द झाल्याची खंत आम्हाला नाही. कारण आम्ही दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर सरावावर अधिक भर देणार आहोत. सराव चांगला झाला तर सामन्यातही चांगली कामगिरी होईल.  विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार